रेसिपी शोजमध्ये वापरल्या जाणाऱ्या उपकरणांबद्दल ही पोस्ट आहे. Turkuaz Kitchenच्या बेतुलचे टर्किश पदार्थ आणि Chef Marwa Elisguiniचे इजिप्शियन पदार्थ बघताना त्या दोघी अनेक वेगवेगळ्या वस्तू वापरतात. त्यातल्या काही आपल्याकडेही सहजपणे वापरल्या जाऊ शकतात. पण कधी कुठे दिसल्या नाहीत किंवा माझ्याकडून बघायच्या हुकलेल्या असू शकतात. उदा. भाज्या वाळवायच्या वेताच्या मोठ्या थाळ्यांना जोडलेली फोल्डिंग जाळी, पॅनकेकचं बॅटर तव्यावर गाळायचा जार, झाकणालाच हॅंडल असलेली ताकाची बरणी आणि ती उघडल्यावर झाकणाच्या दांडीलाच लोण्याचा गोळा एकत्र होणारं तंत्र, पालेभाज्यांसाठीचा उभा चॉपर, हॅंडलचंच रोलर असलेलं (पेंटींगसाठी वापरतात तसं) लाटणं, आपण पूर्वी शेंगदाण्याच्या कुटासाठी वापरायचो तसा छोटा सुक्यामेव्यासाठी बरणीच्या झाकणालाच जोडलेला मॅन्युअल ग्राईंडर वगैरे. रोटी मेकर सदृश पिझ्झा बेकरही दिसतो एक. छोट्या छोट्या पण सोयीच्या गोष्टी दिसतात. त्या मिळतात का आपल्याकडे?
बाकी क्रॉकरी, एस्थेटिक्स, ड्रेसिंग, अॅक्सेसरीज किंवा मॅनिक्युअर्ड हातांच्या बघत रहाव्याशा हालचाली हे तर स्वतंत्रपणे बोलायचे विषय आहेत. शुभ्र पांढऱ्या फ्रिल्स वाल्या पूर्ण बाह्या घालून काही कशात लोळू न देता, न माखता, जणू कुणी राण्याबेगमाच वावरतायत अशा नजाकतीनं आरामात पण सराईतपणे सगळे कारभार चाललेले असतात. कपडे माखतही असतील म्हणा, ते आपल्याला कशाला दाखवतील! विरंगुळा म्हणून बघत असल्यामुळे या सगळ्या बाबींकडे आवर्जून लक्ष जातं आणि बघताना सुखद वाटतं. त्यातलं मनोरंजन मूल्य जपलं जातं. पूर्वी यासाठी नायजेलाला बघायचे, आता ती मागे पडली. आपल्याकडे स्मिता देव आणि अगदी काही प्रमाणात अर्चना आर्ते अशा प्रकारे थोडासा शेफच्या प्रेझेंटेबिलिटीचा विचार करताना दिसतात. ठसठशीत व्यक्तीमत्व, रंगसंगती आणि बोलण्यातही ठामपणा दिसतो. शिजवायला इंडक्शन असावं पण निरनिराळे कागद अंथरण्याची पद्धत समजत नाही. कुणाला काही कल्पना असेल तर सांगा, उत्सुकता आहे. फक्त कॅमेऱ्यापुरतं कागदावर आणून ठेवत असावेत असंही वाटायचं, पण तसं दिसत नाही. भांड्यातले पदार्थ बुडाखाली आच असल्याचं आपापल्या परीनं सांगतात. पदार्थ फार काही वेगळे नसतात, साध्या सोप्या गोष्टीच करतात, पण दाद घेऊन जातात. उदा. सुकवलेल्या भेंडीच्या चुऱ्याची उभी फोडणी.
No comments:
Post a Comment