म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, July 28, 2024

 प्रसन्न रंग रेषा आणि शब्दरहित बुद्धिमान सुखद विनोदांनी आपलंही आयुष्य वाढवणाऱ्या आवडत्या शिदंना १००व्या वाढदिवसानिमित्त सादर अभिवादन आणि उदंड शुभेच्छा

🌼
बालभारतीतून पहिली ओळख झालेल्या या हास्यचित्रकाराची अभ्यासाच्या पुस्तकाबाहेरची भेट बाबांनी घालून दिली. केव्हा ते आठवतही नाही, एवढे ते नियमित भेटत राहिले. घरी येणाऱ्या दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठांवरून आणि स्वतंत्र पुस्तकांमधूनही.
शिदंविषयी पुष्कळ लिहिलं गेलंय, जातंय. पण मला जाणवलेली एक महत्त्वाची बाब, जी आणखीही बरेच जण मांडतील. ती म्हणजे त्यांच्या चित्रातल्या मुली, तरुणी, बायका या फक्त स्त्रिया म्हणून रंगवलेल्या नसतात. म्हणून अधिक भावतात. बऱ्याच वेळा, चित्राच्या विषयाचा संबंध असो, नसो, चितारलेल्या बायका न चुकता टंच, बाईपणाचे चढ उतार ठळकपणे दाखवणाऱ्या असतात. आणि मग ती चित्रं कितीही उत्तम असली तरी उणी वाटतात. हे माझं वैयक्तिक मत आहे.
अमराठी मित्रमंडळींना शिदंची पुस्तकं भेट देऊन मी आणि भेट घेणारेही खुश झालो आहोत. आणि कायमच होत राहणार आहोत.




Monday, July 15, 2024

 #आरण्यक #बंगालीपुस्तकं #अनुवाद

स्वत:च्या अगदीच तुरळक खरडी मनापासून आवडतात, त्यापैकी ही एक. आणि त्याला कारण खुद्द 'आरण्यक'च!
ही खरड वाचताना असं वाटलं की एवढ्या मोजक्या शब्दांत आपल्याला बरं जमलं माववायला. पण तसंच हवं ना बहुतेक. मोहीनी जेवढी अधिक, शब्द तेवढे किमान व्हावेत.
यातल्या भरजरी श्रीमंत मराठीविषयी खूप बोलावंसं वाटतं, पण म्हणजे काय करेन कोण जाणे. 'ततुम्हाअ' मधला संवाद जणू माझ्यासाठीच, तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती वगैरे. त्यापेक्षा सोयीचं म्हणजे शं. बा. शास्त्रींच्या पायाशी माझा आपला पारंपरिक - पदर सावरत कंबरेतून वाकून दोन्ही हात जोडून बांगड्या किणकिणवून तीनतीनदा नमस्कार.
आणि मराठीतली तीन सुमधुर आणि लोकप्रिय नाट्यगीतं या शास्त्रींच्या नावावर आहेत, हे आज समजलं. सुखद आश्चर्य. गुगल करायचा कंटाळा कधी कधी नडतो, तो असा.
बाकी जगता जगता एकीकडे आपणच आपल्यासाठी मनभावन आठवणींची बेगमी केलेली असते, ती अशी.


 जिव्हाळा - रामदास भटकळ

रामदास भटकळांचा त्यांच्या आप्तांशी नातेसंबंधांचा आणि दीर्घ मैत्रीच्या प्रवासांचा भटकळांच्या बाजूचा हा आलेख आहे. खोलवर घेतलेला. भटकळांच्या स्मृतीला दाद द्यावी लागते. प्रदीर्घ लेख आहेत. त्यात येत राहणाऱ्या काळाचा तुकडा चांगलाच मोठा आहे, अनुषंगिक संदर्भ महत्त्वाचे आहेत. संबंधित विषयापेक्षा त्यावर व्यक्त होणारं माणूस समजत जातं, या न्यायानं भटकळांचा प्रभाव जास्त पडला.
मी सहसा क्रमानं वाचत जाते, संपूर्ण पुस्तक आधी चाळून बघत नाही. त्यामुळे यात एकामागून एक येणाऱ्या व्यक्तिमत्वांनी सरप्राईज मिळत राहिलं. गंगाधर गाडगीळ, विंदा आणि दुर्गाबाईंवरचे लेख फार भावले. या तिघांबद्दलचा आदर वाढला. दुर्गाबाई आणखी भुरळ घालतात. कदाचित ही आधीपासूनच आवडीची माणसं आणि आलेले तपशील आपल्या स्नेहभावाशी मेळ खाणारे म्हणूनही असेल असं म्हणता आलं असतं. पण कोणत्याही व्यक्तीच्या आढाव्यात भटकळांनी दुजाभाव मुळात केलेलाच नाही. लेखक लोक माणसं म्हणून कशी असतात हे उगीचच हवं असतं मला, अनेक किस्से, प्रवाद ऐकलेले असतात. ते कुतूहल बऱ्यापैकी समाधानकारकपणे शमलं या व्यक्तीचित्रांमुळे. जरी एकच बाजू समजत असली तरी. तटस्थपणे मांडणीचा प्रामाणिक प्रयत्न दिसतो तरी.
त्यानंतर कुसुमाग्रज आणि ग्रेसांवरचे लेख आवडले. यात 'कुणाला कशाचं आणि .......चं' या उक्तीप्रमाणे पं. मंगेशकर आणि ग्रेस मिळून ग्रेसांच्या काव्यगायनाचा कार्यक्रम करत ही माहिती वाचून दोन कारणांनी काळजात कळ उठली. एक तर हे मला माहिती नव्हतं, नव्यानं कळलं आणि दुसरं ते ऐकणं हुकलं. सडं असताना सलग दहा एक वर्षं तरी खुळ लागल्यासारखं असेल तिथे भावसरगम आणि होतील ते जाहीर कार्यक्रम ऐकले आहेत. एनीवे, ते इथे महत्त्वाचं नाही. कानेटकर, बेडेकर दांपत्यावरचे लेखही चांगले आहेत, फक्त ते उगीचच माझ्या कक्षेबाहेरचे वाटत राहिले. म्हणजे संग्रहात आहेत म्हणून वाचले गेले, औत्सुक्य फारसं नव्हतं. ज्ञानेश्वर नाडकर्णी आणि तारा वनारसेंची फक्त नावंच ऐकली होती, त्यामुळे त्यांच्याशी यानिमित्तानं परिचय झाला असं म्हणता येईल.
यात वारंवार येणाऱ्या उल्लेखामुळे आता 'जिगसॉ'ही वाचावं असं वाटलं. पण लेखक तपशीलांमध्ये त्यांच्याबरोबर आपल्यालाही हाताला धरून इतके बुचकळून काढतात की काही ठिकाणी पुरे आता, मी जरा काठावरच पाय हलवत बसते, असं झालं. काय होतं, गोष्टीच्या पुस्तकासारखं नुसतंच वाचत सुटता येत नाही ना. येणारे इतर संदर्भ, इतर व्यक्ती आणि घोळमेळ, कालखंड लक्षात ठेवावे लागतात. एखादा धागा धरून मधेच मागे जाऊन काहीतरी आठवावं लागतं, कारण मनातल्या मनात आपण हे सगळे तपशील आपल्याही ज्ञात माहितीशी टॅली करत असतो. अशानं शिणायला होतं मग. वेग कमी झाला वाचण्याचा. मी बरेच दिवस घेतले हे संपवायला. पंचाईत म्हणजे फारही रेंगाळता येत नाही, नाही तर बाकीच्या धबडग्यात आधीचा मजकूर सपाट होतो आणि आणखी कष्ट पडतात. पण या सगळ्या कष्टांमध्ये आनंद आहेच.
वाचताना एकीकडे आपणही आपल्या प्रत्येक नात्यात आणि दीर्घ मैत्रीच्या प्रवासात डोकावून बघायला हवं, एक इंटरेस्टिंग एक्सरसाइज होईल असं वाटलं.
माझ्यापुरती एक चांगली गोष्ट म्हणजे यानिमित्तानं मी पुस्तकं पुन्हा विकत घ्यायला लागले. सोळा साली एका जिवलग आप्ताच्या आकस्मिक निधनानंतर त्याच्या मौल्यवान पुस्तकांची झालेली हेळसांड बघून धसकून मी स्वतःसाठी पुस्तकं खरेदी करणं जवळपास बंदच करून टाकलं. माझ्याच आत दडलेल्या किमानवादी माणसानं अगदी पुस्तकांचाही संग्रह नकोच ही सुप्त भावना सोयीस्करपणे उचलून धरली. आठ वर्षांत चित्रभास्कर, रंगभास्कर, वरदान रागाचे, वारसा प्रेमाचा असे मोजके तुरळक अपवाद, तेही जोमदार शिफारस किंवा त्या लेखकांमुळे केलेले. केवळ नीलसाठी आणि भेट देण्यासाठीच खरेदी होत होती आणि जिव्हाळा या दोन्ही कप्प्यांमध्ये बसत नाही. या पुस्तकामुळे 'मला वाचावंसं वाटलं म्हणून माझ्यासाठी घेतलं' हे चक्र पुन्हा सुरू झालं आणि सोबतीनं सोलेदाद, भटकंती वगैरे आणखी थोडी आवक झाली. Abhishek Dhangar, थॅंक्यु🙂
कुणाला वाचायचं असल्यास अवश्य घेऊन जाणे. परत आणून दिलं तर उत्तम. पण पुस्तक नेलं म्हणजे जबाबदारी आली वगैरे मानू नये आणि हरवण्याची वगैरे धास्ती बाळगू नये. हे सगळे टप्पे यथासांग पार पडले असल्यामुळे चिंता इल्ले. पुस्तकं वाचली जाणं, एकमेकांकडे फिरत राहणं, त्यावर काही तरी बोलणं होणं अधिक मजेचं आहे.



Saturday, July 13, 2024

 Meghana Bhuskute अतिशय आवडला लेख.

अत्यंत समर्पक शीर्षक आणि पायरी पायरीनं प्रमेय सोडवत आणल्यागत शेवटाकडच्या त्याच्या सार्थ अन्वयार्थासकट.
आवडीच्या व्यक्ती इतरांच्या विविध दृष्टीकोनातून उलगडून पाहताना अधिक देखण्या वाटतात.
प्रिय सुनीताबाईंनी अचंबित करत राहणं आटोक्यात येत नाही.
एक+अर्धा+पाव असा जमलेल्या लेखांचा खाऊ आणि पाऊस = रविवार सकाळ सुफळ संपूर्ण.


Friday, July 5, 2024

 आषाढ म्हणजे सर्वात आवडता मराठी महिना. सबंध वर्षभराच्या तृषा-क्षुधाशांतीची तजवीज करणारा पाऊसकाळ. पोळून काढणाऱ्या ग्रीष्माला निरोप देऊन सृष्टीला, नजरेला, खरंतर सगळ्या जाणीवांनाच शांत करणारा वर्षा ऋतू.

दैवी कुमार, विदुषी शोभा गुर्टू आणि कविवर्य वसंत बापटांनी पाडलेला हा श्रवणीय पाऊस.
आषाढाच्या पहिल्या दिवसानिमित्त.
रितु बरखा आई घन गरजे गरजे बिजली चमाकै बरसे ॥
सननन सननन करि हो चहुं दिसि घेरी री है अबहि धमाकै बरसे ॥
तेव्हा टीआरपीची गणितं नव्हती हे केवढं बरं होतं. नाही तर तेव्हाही असे कार्यक्रम होऊ शकले नसते.
https://www.youtube.com/watch?v=VN4OA68KEwk

Monday, July 1, 2024

 हेरमान हेसेचा जन्मदिन आणि सध्या हातात घेतलेला चवीनं वाचण्यासारखा त्याच्या एका आविष्काराचा रमणीय अनुवाद

🌼☘️