म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, December 12, 2025

 काल मंडपात ही सुरेल जोडगोळी माझ्या पुढ्यातच बसली होती. गाण्याचं एक सत्र संपलं की चिमखडी ओठ काढून नाराज आणि सुरू झालं की मादाम पुन्हा खुश. आता अकराव्या महिन्यातच जग बागडून घ्यायच्या हौशी चुळबुळीनं घरची ४-५ गडीमाणसं दिमतीला असून पुरे पडत नव्हती. सखीला आणि मानसींना भेटून जाम आनंद झाला.

मी स्वतःला पण जरा शाबासकी देऊन घेतली. कारण एरवी आठवणींचा खंदक असले तरी सखी-मानसींची क्लिप इतक्यांदा ऐकली-बघितलीये की त्या दिसल्यावर ओळख पटायला मिनिटही लागलं नाही. आभासी आणि खऱ्या जगाची अशी मनभावन गुंफण मला वारंवार अनुभवता आली आहे!
https://www.facebook.com/reel/1429194994922403

Sunday, August 24, 2025

 गेल्या वर्षी आणि यंदाही, खास करून मागच्या मुसळधार आठवड्यात, दृष्टद्युम्न प्रजापती धुमकेतू वगैरे बारीशकराला हाक मारावी आणि तुझी पोतडी उघडून पावसाला बोलवण्यासाठी जसा मंत्र घालतोस, तसा विश्रांती घेण्यासाठीही छडी फिरवून अल्लामंतर कोल्लामंतर छू कर बाबा म्हणायची फार इच्छा झाली होती. पाऊस तसा व्यक्तीश: लाडका असला तरी विराम घेणारं, दूर जाऊन जवळ येणारं, क्वचित अधेमधे अंतर्धान पावणारंही नातं असेल तर गोडी राहते, त्यातली गत होते पावसाबरोबरही. सारखं अंगचटीला येणं नकोसंच होतं, अगदी पाऊस असला म्हणून काय झालं! पण मुद्दा तो नाही. त्या दोन्ही आठवणींच्या वेळी थोडासा रुमानी बघून घेतला.

मागच्या आठवड्यात 'सुमित्रा भावेंच्या संहितेतलं मानसशास्त्र' ऐकताना सुखांताबद्दलचं त्यांचं तत्त्वज्ञान ऐकल्यावर आठवलेल्या अनेक सुखांतांतही थोडासा रुमानी तो होनाही था. सुखांत येईतोवर तो पाऊस तेवढ्या दोन तासांत साचलेल्या कितीतरी तगमगींवर शिंपड घालतो तो सगळा एकत्र परिणाम जाणवतो आपल्याला. हल्ली आत्मचरित्रं वाचण्यात फारसं स्वारस्य नसतं मला, पण ऐवज आणि तर..अशी सारी गंमत, निव्वळ थोडासा रुमानीची निर्मितीकथा वाचण्यासाठी चाळायलाच हवीत हे सिनेमा बघताना एकदम लक्षात आलं. थोडासा रुमानीतलं पालेकर दांपत्याचं सिंक्रोनायझेशन हेवा वाटावं असं आहे. पटकथेवरचं काव्यात्म संवादांचं नक्षीकाम, भूमिकांमधले चपखल चेहरे आणि एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना आपण जसे सहज लकेर घेत किंवा अर्धवट गुणगुणत असतो तशा हवेतच लाटा आल्यासारख्या चाली. एकातून पुढचीत शिरणाऱ्या. चंदावरकर नेहमीप्रमाणेच खुश करून टाकतात. टायटल सॉंगची छाया गांगुलींची सुरावट विनोद राठोंडाच्या व्हर्जनपेक्षा अधिक खेळकर आणि फिरती असण्यामागेही मला हसरी, खुश, उमेदी स्त्री दिसते.
दोन्ही वेळेस समोर स्क्रीनवर ती शुष्कता, उकाडा दाखवणारे विशिष्ट नमुन्यात भिजलेले कपडे, गळ्यांवरचे ओघळ, कपाळांवरचे घामाचे थेंब बघताना माझ्या मागे पावसाचा जोराचा तडतडबाजा चालू होता. पडद्यावर हिवाळा, पावसाळा हे ऋतू दाखवणं त्यातल्या त्यात सोपं पडत असेल, पण उन्हाळा कठीण असावा. वाळवंट किंवा दुष्काळी भाग असेल तर रखरख शक्य आहे, बनगरवाडीतली रखरख तर विशेष आठवते. पण उकाडा, काहिली कशी दाखवणार? तेही पचमढीसारख्या सदाहरित ठिकाणी. पण कळते ती.
वयाच्या प्रत्येक टप्प्यावर बघावा थोडासा रुमानी. भुरळ आहे. कोट म्हणून एखादं वाक्य, ओळ उचलावी म्हणलं तर अख्खी संहिताच चिमटीत धरून ठेवावी लागेल. प्रेम, उमेद, विश्वास, आनंद, आंतरीक सौंदर्य, स्वतःचा जसाच्या तसा स्वीकार, खळखळून हसणं, निखळ निकोप दृष्टिकोन, भान, यांच्या व्याख्या आणि गरज, दोन्हींची उजळणी करून घेतात पालेकर्स. पूर्वग्रह, आढ्यता, अहंकार अशी तणं छाटा म्हणतात. स्त्रीत्व म्हणजे काय हे तर बारीशकरच्या तोंडून ऐकावं. त्या पात्राचं प्रयोजन आणि नाना पाटेकरांची अभिव्यक्ती यावर बोलण्याएवढी माझी कुवत नाही. पण बिन्नीबरोबरचे संवाद, खास करून भग्न इमारतीतले, आणि चेहरा तादात्म्य दाखवतात. युट्यूबवर कुणीतरी त्यांना या भूमिकेसाठी सबलाईम म्हटलंय, ते सार्थ आहे. स्वतःला सापडलेल्या बिन्नीचं सोसाट्याच्या वाऱ्यानं रसपानाला बोलावल्यासारखं झालेलं भिरभिरं अनिता कंवर सॉलिड दाखवतात.
पारायणं करण्याची चीज आहे ही माझ्यासाठी. त्यावर बोलत किंवा लिहित बसणं फोल आहे. कालातीत गोष्टींवर काही लिहिणं-बोलणं तसंही अनावश्यक. तस्मात्, ते न करणं हितकर.

Saturday, August 16, 2025

 शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असे कितीतरी उपाय निघतील आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं तर.

ज्या ज्या सणा-जयंत्यांना डीजे लागतात, तेव्हा ते उपलब्ध होऊ दिले नाहीत तर? डीजे सप्लायर्सवर दबाव आणला तर? प्रत्येक दहीहंडीच्या खाली, गणपती-नवरात्र मंडपांच्या जागी सतरंज्या अंथरून बिट्ट्या, गजगे, सापशिडी, बुद्धीबळाचे डाव टाकून बसलो तर? घरातून डबे, पाणी आणून अंगतपंगती केल्या तर? पोरांना घेऊन गोष्टी सांगत गप्पा मारत गाणी म्हणत बसलो तर? भोवतीच्या सगळ्या इमारतींच्या रहिवाश्यांनी गच्चीवर उभं राहून खाली (हल्ली कुंड्यांमध्ये भरतात ते) गोटेफेक केली तर? अश्रुधूर केला तर? लाफिंग गॅस सोडला तर? अंगावर खाजकुयल्या टाकल्या तर? धामणीसारखे बिनविषारी साप १२-१५ सोडले तर? लांबून नेम धरून गोफणी फिरवून डीजेच्या जाळ्या फोडल्या तर? कार्यक्रम सुरू झाल्यावर अर्ध्या तासात युक्ती करून कार्यकर्त्यांना भांग पाजली तर? दहीहंडी आपणच दहा फुटांवर बांधून फक्त बाळगोपाळांकडूनच फार तर दोन ते तीन थर बांधून पारंपरिक तऱ्हेनं साजरी केली तर? कशाला हवीत मंडळं? मंडळांचं सद्य काळात प्रयोजन काय उरलंय? प्रत्येक मंडळाच्या संचालक मंडळाला घराबाहेर पडू दिलं नाही तर? कार्यकर्त्यांना दिशाच मिळू दिली नाही तर? बाऊन्सर्स नेमून मंडप उभारू दिले नाहीत तर?
अक्षरशः गळाठून बसलो चार ते दहा. भिंती, दारं, खिडक्या जोरदार हादरत होतं. हतबल वाटलं. एकादुकट्यानं काही केलं तर हकनाक जीव गमवावा लागेल. पोलीस आणि नेते काहीही करणार नाहीयेत कारण त्यांना करायचंच नाहीये.
जेमतेम १००-१५० रिकामे, डोकं बाजूला ठेवलेले लोक लाखो लोकांना वेठीला धरतात आणि ते लाखो लोक काहीही करू शकत नाहीत, ही भलती गंमत आहे लोकशाहीतली.
पण असं खरंच आहे का? आपण बुद्धी वापरू शकत नाही का? जीव धोक्यात न घालता गनिमी कावा वापरून या दडपशाहीला आळा घालता येण्याचे कोणकोणते मार्ग सुचतात तुम्हाला? आपणही दबावगट, दडपशाही करू शकतो की. चांगल्या पद्धतीनं करायची, एवढंच.
देवभोळ्या, सश्रद्ध, नास्तिक, दोन्हीकडे भोज्जे करणाऱ्या, कुंपणावर बसलेल्या, सगळ्यांनी सांगा. वृद्ध व्यक्ती, लहान बाळं, मुलं, परीक्षार्थी, आजारी माणसं, प्राणी, पक्षी, दवाखाने यापैकी काही ना काही घरी, दारी, भोवती असतंच. यातलं काही नसलं तरी त्रास प्रत्येकाला होतो.

Thursday, August 7, 2025

 सेवेत हयगय केल्याबद्दल घरातील समस्त नोकरवर्गाला फैलावर घेणाऱ्या विली कोडोलीकर

🙊🙉🙈
मेरी बिल्ली मुझपर म्यांव मोमेंट तंतोतंत!


Friday, August 1, 2025

 स्वयंपाकघर आणि मुलं

बहुतांश लहान मुलांना स्वयंपाकघरात खेळायला आवडतं हा तुमचाही अनुभव असेल. साधारणपणे उभं राहायला लागल्यापासून चौथ्या पाचव्या वर्षापर्यंत मांडणीतली, ट्रॉलीतली भांडी काढघाल, ट्रॉलीत जाऊन बस, खालून न दिसणाऱ्या पण हाताला येणाऱ्या ओट्यावरच्या कोणत्याही लहान मोठ्या वस्तू खाली ओढ हे उद्योग सर्रास चालतात.
माझा मुलगा असा स्वयंपाकघरात मनसोक्त खेळायचा. तो लहान असताना घरी पर्लपेटच्या निरनिराळ्या आकारांच्या चिक्कार बरण्या होत्या. सामान पूर्ण भरलेल्या, अर्ध्या, रिकाम्या, दोन ते पाव किलो अशा आकारांच्या सर्व बरण्यांचे असंख्य खेळ तासनतास चालू असायचे. झाकणं घट्ट लावली आहेत एवढी फक्त खात्री करायचो आम्ही. आणि तिखट, लाल मिरची वगैरे लांब. बाकी मुक्त प्रवेश. कप्प्यातून त्या बरण्या काढणं, पुन्हा लावणं, उचलणं, इकडून तिकडे नेणं, रिकाम्या बरण्यांची झाकणं फिरवून काढणं लावणं, हे मोटर डेव्हलपमेंटला उपयोगी पडलं असावं. आगगाड्या, शिड्या, घरं, बस, दुकानं, शाळा, जहाजं, हॉटेल, काय वाट्टेल ते सुचायचं त्याला. जिन्नसांची ओळख परेड पण पुष्कळ झाली. आम्ही कुणीतरी भोवती असायचो. खबरदारी म्हणून, आणि असल्या खेळांमध्ये सवंगडी लागतात, म्हणूनही. बोलता येत नसेल तर त्या वस्तू आपल्याला दाखवणं आणि बोलायला लागल्यावर तोंडानं त्या वस्तूंची गोष्ट रचून आपल्याला सांगणं चालू असतं.
त्या बरण्यांच्या दणकटपणामुळं, पेचांच्या झाकणांमुळं, बरण्यांना कुठंही धार, टोकं नसल्यामुळे त्याला इजा होणार नाही ही निश्चिंती होती. पाण्याच्या टबात डुंबताना पण एखादी बरणी न्यायचा. या सगळ्यात कधी सांडलवंड, फुटणं झालं नाही. आठवण म्हणून त्यातल्या १-२ ठेवल्या आहेत अजून. तो पातेल्याला तापेलं वगैरे पुष्कळ उलटसुलट उच्चारही करायचा. बरेच गंमतीशीर शब्द होते, पण त्या वेळच्या नोंदी बघितल्याशिवाय ते आठवणार नाहीत.
थोडा मोठा झाल्यावर येऊन पडलेल्या वाणसामानाची दुकानं आणि ट्रकनं वाहतूक चालू झाली. आणखी थोडा मोठा झाल्यावर परात, मोठे कुंडे, मोठी पातेली ही बस चालवायची चाकं होऊ लागली. इमारतीतली मुलं म्हणजे बसमधले प्रवासी. मग बसचालक, ड्युटी आणि रूट बदलायचे, पण चाकं तीच.
मुलगा भातुकलीनं पण खेळला काही काळ, पण मोठ्या भांड्यांच्या खेळात भातुकलीनं खेळणं फार काळ टिकलं नाही.
तुमची मुलं स्वयंपाकघरात कोणत्या भांड्यांनी, वस्तूंनी खेळायची आणि खेळतात? मुलं आणि स्वयंपाकघरासंबंधी तुमच्या काही एकत्र आठवणी आहेत का? त्यांचे किस्से, मजेशीर शब्द तुम्ही लिहून ठेवलेले आहेत का?























Friday, July 25, 2025

 काल दीप अमावास्या, दिव्यांची आवस, दीप पूजन झालं.

बाजरीच्या पीठाचे किंवा कणकेचे गूळ घालून वाफवलेले दिवे आणि त्यावर साजूक तुप. पावसामुळं आलेल्या गारव्यात हे माफक गोडसर वाफाळते दिवे गट्टम् करण्यात सुख आहे.
करायला आणि खायलाही सोपा, सुटसुटीत पदार्थ.
🌼अत्त दीप भव🌼
🌼दीपज्योतिर्नमोऽस्तुते🌼

Wednesday, July 9, 2025

Sunday, April 20, 2025

 कान, डोळे आणि मन, तिन्ही खुश झालेत.

दिवस साजरा झाला.

https://www.facebook.com/reel/1429194994922403

Wednesday, March 5, 2025

 #तलखी

तलखीच्या कप्प्यात हे बसेल का खात्री नाही. पोटाला आराम आणि हलकं वाटतं एवढं खरं.
नाचणीचं आणि तांदळाचं पीठ प्रत्येकी दोन चमचे, दुध्याचा आणि काकडीचा खिस, छोटीशी हिरवी मिरची, लसणाच्या दोन पाकळ्या ठेचून, कोथिंबीर, मीठ, हे सगळं ताकात ओतीव होईल असं भिजवलं आणि दोन तव्यांवर धिरडी घातली. झाकण ठेवून भाजली.
तांदळाच्या पीठामुळं लोखंडी तव्यावरचं धिरडंही नीट सुटतं. झाकण ठेवल्यामुळे शिजतात आणि चटचट होतात, खेळत वाट बघत बसायला लागत नाही.
थोडे मोडाचे मूग होते, ते असेच घातलेत.
शेजारी स्ट्रॉबेरी क्रशचा थेंब घातलेलं फिकं गार दूध आहे.