म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Thursday, October 31, 2024

 शुभ दीपोत्सव, मंडळी

🪔
सगळ्यांना आनंदाचा, उमेदीचा लखलाभ होऊ दे.
एक रंकाळा संध्यामठाजवळचा, आसमंत उजळणारा
एक रंकाळा खिडकीतला, अंधार चिरत जाणारा




Saturday, October 26, 2024

 

😄😄
पण एवढ्यानं काय होतंय!
गाडी जीव खाऊन तर्राट पळवत नेऊन प्रार्थना सुरू व्हायच्या एक सेकंद आधी करकचून ब्रेक दाबण्याचा आवाज आणि आई आहे तो हो जाएगा या आविर्भावात रांगेला लागणारे निवांत युवराज दाखवल्याशिवाय हे चित्र अपूर्ण आहे.
मग remaining part of the feature film after the break ही पाटी लटकवून होणारा जगातल्या सगळ्यात दुष्ट आईचा साग्रसंगीत एपिसोड संध्याकाळी.

https://www.facebook.com/CoffyBiteIndia/videos/1590636431849447

7:59 AM: racing against the clock and mom 🚀

Friday, October 25, 2024

 पुण्यानं बोलीभाषा संकलनाच्या उपक्रमात सर्वात मोठा भ्रमनिरास केला.

अर्थात पुण्यानं जरी कोणत्याही गोष्टींचा मक्ता घेतला नसला, तरी अगदी दिडशे लोक जमवण्यासाठी घाम फुटणं सुद्धा अपेक्षित नव्हतं. सगळ्या कमी जास्त मुद्द्यांसकटही इथं मराठी विषयी थोडी अधिक आस्था आहे, हे एक, आणि अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले अनंत मराठी बोलीभाषक इथे आताशा मोठ्या प्रमाणावर एकवटतायत, हे दुसरं.
या उपक्रमासाठी स्वतंत्र जाहिरात करावी, एवढी ऐपत या कामासाठी मिळणाऱ्या निधीत नाही. जरी हे काम खुद्द केंद्र सरकारच्या माहिती आणि नभोवाणी मंत्रालयासाठीच चालू असलं तरी. उलट या स्वरूपामुळे अनेक बंधनंच वाटेत येतात. त्यामुळे भिस्त संपूर्णपणे आपापल्या व्यक्तीगत आवाहनांवर, ओळखींवरच. पण त्याही ओळखींची, मैत्री संबंधांची क्वचितच मदत झाली, हे नमूद करायला हवं. खास करून मराठी संदर्भात विविध स्तरावर होणाऱ्या गफलती आणि चुका रोजच्या रोज, कर्तव्य असल्यासारखे दाखवून देणारे लोक, मराठी विषयी चिंतेत असणारे अनेक जण त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्यापर्यंत पुन्हा पुन्हा पोहोचूनही साधी पोहोचही देण्याचं सौजन्य दाखवू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी ते करावंच असं गरजेचं नाही, हेसुद्धा खरंच. व्याप असतात, अडचणी असतात, हे काही नसेल तरी यावंसं वाटलं नाही, हेही माझ्या मते पुरेसं सबळ कारण आहे. पण सरसकट दखलच न घेणं हा अनुभव आश्चर्यकारक आहे. जे स्नेही सहभागी झाले त्यांच्याविषयी आदर आहे.
कौतुक आणि त्याचा चमू फार प्रामाणिकपणे, मेहनतीनं आणि अक्षरशः वाट्टेल त्या परिस्थितीत नाउमेद न होता नेटानं हे काम पुढे नेत आहेत. त्यामागे मातृभाषेबद्दलचा जिव्हाळा जास्त आहे. कारण अपुऱ्या निधीमुळे या कामासाठी त्यांना दिडक्याही जेमतेमच मिळतायत. त्यामुळे त्यांच्या चिकाटीचं कौतुक आहे. निदान पुढच्या जिल्ह्यांमध्ये तरी त्यांच्या कष्टांचं चीज व्हावं आणि या उपक्रमाला समाधानकारक प्रतिसाद मिळावा अशी रास्त अपेक्षा आहे.
#Kautuk Shirodkar's Facebook Post dated 26/10/24.

Monday, October 21, 2024

 उष्टंशेण

तुमच्याकडे असायचं का?
माझी आई स्वच्छतेच्या बाबतीत फार काटेकोर होती. आमच्या घरी फरशी केव्हा घातली ते पक्कं आठवत नाही. पण जमीन होती तोपर्यंतचं रुटीन छान आठवतंय. शेजारपाजारी सगळ्यांकडेच तसं असायचं म्हणून ते चित्र डोक्यात घट्ट बसलंय. आम्ही ऐन शहरात राहत होतो तरी भोवती तसे चिक्कार गोठे होते. त्यामुळे शेणाचा तितका तुटवडा नव्हता. जवळपासच्या गोठ्यांमधून रितसर घमेल्यातून शेण आणून जमीन सारवणे किंवा अगदी शाळेत जाताना घरापाशीच कुठं रस्त्यात शेणाचा ताजा पो पडलेला दिसला तर लगेच तो जमेल तसा दोन्ही हातांनी उचलून घरी आणणे आणि हात धुऊन पुन्हा शाळेचा रस्ता धरणे हे सर्रास केलेलं आहे. मीच असं नाही, माझ्या वर्गातल्या पुष्कळ मुली हे करायच्या. शेणाचा, गोमूत्राचा, कडब्याचा किंवा एकंदरच गोठ्याचा गंध मला आवडतो, त्यामुळे घाण वाटण्याचा प्रश्न आला नाही. असता तरी आईनं खपवून घेतला असता का तीच जाणे. ती स्वतः कामात आकंठ बुडालेली असल्यामुळे आमची मदत घेणं भागच असायचं तिला.
महिन्यातून किंवा तीन आठवड्यातून एकदा जमीन सारवावी लागायची. वेगळी सवड काढलेली असायची त्यासाठी. मग शेणाची पाटी आणि पाण्याची छोटी बादली आपल्या शेजारी ठेवायचे. खोलीत जमिनीवर असलेल्या उचलून ठेवता येणाऱ्या वस्तू वर कुठेतरी ठेवून जमीन शक्य तितकी रिकामी करून घ्यायची. सारवणात लोळणार नाही अशा बेतानं आधी आपला फ्रॉक सगळ्या बाजूंनी सावरून तो घोळ पुढे पोटाशी एकत्र गोळा करून घ्यायचा. केस डोळ्यावर येणार नाहीत असे नीट बांधायचे. लांब बाह्यांचा फ्रॉक तर मुद्दलात घालायचाच नाही आणि जरा मोठ्या बाह्या असतील तर त्या कोपराच्या वरपर्यंत दुमडायच्या. मग उकीडवं बसायचं. (आता तेवढा वेळ सलग तसं बसण्याचा नुसता विचार सुद्धा करू शकत नाही मी!) खोलीच्या एका कोणत्या तरी कोपऱ्यातून सुरुवात करायची आणि क्रमाक्रमानं मागं मागं येत विरुद्ध कोपऱ्यात सारवण आणून टेकवायचं. शक्यतो बाहेर जायच्या दरवाजाकडेच. नाही तर चवडे जेमतेम टेकतील असं चालत ओल्या निसरड्या जमिनीवरून तोल सावरत सर्कस करत बाहेर पडायला लागणार आणि सारवणाची नक्षी बिघडणार ते निराळंच.
एकावेळी थोडंच शेण जमिनीवर घेत, त्यात लागेल तितकंच पाणी डाव्या हातानं घेत (म्हणजे तेवढीच बादली पाणी पुरतं आणि ते शेवटपर्यंत स्वच्छ राहतं) हळूहळू मिसळत शेणाच्या गोळ्याची सेमी लिक्विड कंसिस्टंसी करून एकाच हातानं (हो, दोन्ही हात बरबटवायचे नाहीत. भाकरी करतानाही हाच नियम होता. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.) ते पातळ शेण अर्धगोलाकार नीटस आकारात दंडाच्या खुब्यापासून संपूर्ण हात वापरून फिरवत, मधेमधे तळहात जागच्या जागी आपटून तळहाताला चिकटून बसलेलं शेण खाली पाडत जमीन एकसारखी सारवणं हे एकाग्र करणारं काम आहे. उत्तम दर्जाचं ध्यान लागण्याइतकं. मग त्या ताज्या सारवणावर, पायाखाली येणार नाही अशा एखाद्या कोपऱ्यात आई शुभ्र रांगोळी रेखायची आणि पांढरी रांगोळी तशीच ठेवायची नाही म्हणून त्यावर हळदकुकंवाची चिमूट टेकवायची. रांगोळी म्हणजे उभ्या उभ्या वाकून भराभर रेखलेली बहुतांश वेळा गोपद्मं, स्वस्तिक, दंडावरचा पृथ्वी गोल वगैरे चैत्रांगणातली शुभ चिन्हं असायची. १८० अंशातले, कोनमापकाच्या आकाराचे ते सारवणाचे फर्राटे सुकले की सुबक दिसतात. मेंदी रंगावरच्या त्या कोनमापकांवर कुठेतरी कोन साधून काढलेली ती रांगोळी फार देखणी दिसायची. का कोण जाणे, पण स्वच्छ, प्रसन्न, आनंदी वाटायचं. ताजं सारवण झालेल्या घरात मनभावन सुवास पसरलेला असतो.
आनंद यादवांच्या आत्मचरित्राच्या एका भागाचं नाव काचवेल आहे. फुटलेल्या बांगड्यांचे रंगीबेरंगी तुकडे आडवे आडवे जोडून जमिनीवर केलेल्या नक्षीला काचवेल म्हणतात. त्यावरून चालताना पायाला लागणार नाहीत अशा बेतानं ते तुकडे जमिनीत रुतवून लावतात. सारवणाच्या जमिनी असणाऱ्या घरांमध्ये अशा काचवेली भरपूर दिसायच्या आणि त्या नक्षीमधून त्या घरातल्या बायकांची कल्पकताही. आमच्या घरी कधी काचवेल केली नव्हती. बहुतेक ती पद्धत शेतकरी कुटुंबांमध्ये आहे.
तर मुख्य मुद्दा आहे उष्टंशेण.
त्या सारवणाच्या शेणातलं थोडं बाजूला काढून ठेवायचं आणि ते उष्टंशेण करायला थोडं थोडं वापरायचं.
जेवायला तर आपण सगळेच पूर्वी एकत्र जमिनीवर बसायचो. मधे अन्नाची भांडी घेऊन त्याभोवती गोल करून. वाढताना आणि जेवताना अन्न खाली सांडतं. बाबा तेव्हा चित्रावळ घालायचे. आता पानाभोवती नुसतं पाणी फिरवतात. तर तो चित्रावळीचा चिमखडा घास असायचा. दररोज जेवणं झाली की पानं उचलून उरलेलं अन्न काढून ठेवून जेवण्याची जागा रिकामी करायची. जेवलेल्या सगळ्या जागेवर हात फिरवून अन्नाचे ते सांडलवंड झालेले कण एकत्र गोळा करून उचलायचे आणि मग पाणी शिंपडून ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची. हे झालं नेहमीचं रुटीन. पण असं करताना अन्नाचे सगळे कण निघतीलच असं नाही. म्हणून थोड्याशा शेणाचा, म्हणजे किती तर अगदी अर्ध्या वाटीभर वगैरे, एक लांबट गोळा करून त्या जेवलेल्या जागेवर व्यवस्थित घोळवून फिरवून घ्यायचा. म्हणजे डोळ्याला न दिसलेले अन्नकणही त्या गोळ्याला चिकटून उचलले जातील आणि ती जागा लख्ख होईल. अन्नाच्या वासानं किडा, मुंगी येणार नाही, एका अर्थानं ते निर्जंतुकीकरणच. शेण गोळा फिरवल्यावर मग पुसून घ्यायचं. उष्टं अन्न गोळा करणारं म्हणून ते उष्टंशेण असावं असा माझा कयास. तो बरोबर आहे की कसं ते सांगा कुणीतरी. हा सव्यापसव्य आमच्या मातोश्रींनी घरी फरशी बसवल्यावरही चालू ठेवला होता. तेव्हा फरशी पुसणं हे सोपं काम झालं होतं, पण उष्टंशेण करायचा मला जाम कंटाळा यायचा. पण करावं मात्र लागायचं. त्याशिवाय आईला शांत, समाधानी वाटायचं नाही.
आता जेवणं झाल्यावर टेबल मॅट्सवर सांडलेले अन्नकण गोळा करून ओल्या फडक्यानं पुसताना हे उष्टंशेण आठवून गंमत वाटते. त्याचवेळी आपण सगळ्यांनी अनुभवलेल्या ट्रान्स्फॉर्मेशन्सच्या अद्भुत टप्प्यांनी थक्क व्हायला होतं.
तुमच्या घरी केलं जायचं का हे उष्टंशेण? तुमच्याही आठवणी असतील तर नक्की सांगा.

Wednesday, October 16, 2024

 #marksinsoho #मार्क्सइनसोहो

बरोबर दोन वर्षांपूर्वी बघितलेल्या नेटक्या प्रयोगाची आणि रंगलेल्या गप्पांची आठवण.
शोभाताईंना यातला संदर्भ प्रत्यक्ष सांगायला हवा होता. हे लिहिल्यानंतरही एकदा ऐसपैस भेट झाली, पण हा उल्लेख करायला साफ विसरले. त्यांच्याबरोबर बोलताना एकातून एक विषय निघत जाऊन गुंग होणं ठरलेलं असायचं. ही हळहळ आज हे वाचताना फार वाटली. गारांचा पाऊस आजही हाताशी असतं, हे मात्र पुष्कळदा सांगता आलं त्यांना. ते पुस्तक म्हणजे एक सदाहरित गाथा आहे.
#Posted on 15th October 2022

Saturday, October 12, 2024

 ही शहाणीशी छोटेखानी कादंबरी एका बैठकीत हातावेगळी केली आणि दसरा सत्कारणी लागला. आवर्जून वाचनीय आहे.

यामध्ये एका नाण्यानं घडवलेला एका किशोरवयीन मुलाचा सुरस प्रवास आहे. पण त्या प्रवासात सामान्य विज्ञान, परिस्थितीकी, नाणकशास्त्र, संग्रहालयशास्त्र, इतिहास, भूगोल, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, तसंच चवीपुरतं तत्त्वज्ञान आणि व्यवहारज्ञान येतं. याबरोबरीनं ग्रामीण आणि शहरी वास्तव दर्शन आहे. मैत्रीचे विविध पदर, पिढ्यांतर्गत वैचारिक तफावत, प्रत्यक्ष आणि व्यावसायिक नातेसंबंधांचे अनेक तऱ्हेनं डोकावणारे अंतर्गत प्रवाह, काही ठिकाणी अपरिहार्यपणे येणारी तांत्रिक माहिती, मुख्य म्हणजे जगरहाटी अतिशय व्यवस्थितपणे मांडली आहे. एवढुशा पुस्तकात हे एवढं सगळं खच्चून भरलेलं असूनही ते कुठेही कोरडं, रटाळ होत नाही. गंभीर वस्तुस्थितीची पार्श्वभूमी असूनही घटनांचं वर्णन बागुलबुवा सारखं अंगावर आणलेलं नाही. घडामोडींचं महत्त्व प्रस्थापित व्हावं पण त्याच वेळी त्यावर सखोल विचार व्हावा अशी योजना केलेली आहे. समकालीन आणि उत्कृष्ट भाषा, समकालीन महत्त्वाचे विषय, अतिशय जबाबदार हाताळणी, वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या चर्चा अशा अनेक बाबी विशेष जाणवल्या. संपूर्ण पुस्तकाचा तोल शेवटपर्यंत टिकला आहे, जराही भरकटत नाही. किशोरवयीन मुलांची दुनिया चितारणारी अनेक पुस्तकं आहेत, ही त्यातली एक दमदार भर आहे.
लेखिकेचं हे पहिलंच पुस्तक आहे असं प्रस्तावनेत लिहिलंय. तिची पार्श्वभूमी ललित लेखनाची नाही, पण लेखनातलं क्राफ्टिंग कौशल्यपूर्ण आहे. वाचताना अनेक ठिकाणी मी मनोमन लेखिकेची प्रशंसा करत राहिले. मीही परिस्थितीकीची विद्यार्थिनी असल्यामुळे जरा अधिक आत्मियतेनं आणि तेवढंच चिकित्सकपणे वाचलं गेलं. आणि हे अधिकाधिक लोकांनी आणि खरंतर पालकांनी तरी वाचायला हवं असं फार वाटलं.
बऱ्याच वर्षांपूर्वी मायबोलीच्या एका दिवाळी अंकात मी भूमिजा नावाची कथा लिहिली होती. त्यातली मुलगी शिक्षण झाल्यावर शहरातून परत येऊन घरची शेती करायला लागते. जीन्स गुडघ्यापर्यंत दुमडून ती भातलावणीसाठी चिखलात उतरलेली वगैरे दाखवली होती मी. ही कादंबरी वाचताना थोडी ती आठवण आली. स्वानंदी सरदेसाईचे व्लॉग्ज बघताना पण ती कथा आठवते. शिवाय उगीचच जराशी झाडाझडतीची आणि खैरनारांच्या शोधचीही आठवण झाली. असो.
आश्चर्य वाटतंय की हे पुस्तक मला अजिबातच माहीत नव्हतं. ना कुणाच्या बोलण्यात आलं, ना परीक्षण वाचण्यात आलं, ना कुठे प्रदर्शनात दिसलं. दहा वर्षांत कुठेही एखादा उल्लेख देखील समोर आला नाही. आता मिळालं त्याकरता थॅंक्स टू माझी आत्या आणि शारदा मठाचं वाचनालय. उत्तमोत्तम पुस्तकं उपलब्ध असतात तिथे.