आमचा आजन्म छंद
म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...
Friday, February 6, 2026
संज्योत पाक खुळं झालंय मसालेभाताच्या चवीनं
बाबांकडून असंख्य वेळा, किंबहुना कार्याचा मसालेभात आणि चिंगु आमटी म्हणजे मिरज आणि गोरे मंगल कार्यालय हेच गोडवे ऐकते. पण आता कुणीतरी खास तिथं होणाऱ्या कार्याला निमंत्रित केल्याशिवाय काय आमचा योग येत नसतोय.
संज्योतचा मसालेभात चांगला झालाय हे रंगरुपावरून कळतंयच. मसालेभात रंगाला असाच हवा. अंगभर गोडा मसाला ल्यायलेला सावळसर आणि शीत रग्गड वाफ पोटात घेतलेलं. तांदूळही आंबेमोहोर, रत्नागिरी २४, जिरगा, घनसाळपैकी असला तर दुधात साखर. आठवड्यापूर्वीच आजऱ्यातनं घनसाळ आणवलाय तवर ह्या बाबानं मसालेभात दाखवला. बेत करावा लागतोय आता लवकरच.
https://www.youtube.com/watch?v=pLApqJIP9ao
Monday, January 12, 2026
भोगी
भोगीला गल्लीतल्या घराघरातून भाजी भाकरीची ताटं येणार म्हणजे येणार. सकाळपासून भाकरी थापून सगळा बेत आटोपून, शक्यतो घोळक्यानं एकत्र जायचं साधायच्या नादात घामाघूम होऊन धापा टाकत, त्यातच सणाला बऱ्या दिसतील, जरीची निदान किनार तरी डोकावेल अशा साड्या नेसून, क्रोशाच्या नाही तर लोकरीच्या मोठाल्या रंगीबेरंगी डॉयल्यांखाली झाकलेली एकावर एक किमान चार तरी ताटं घेऊन बाराच्या आगंमागंच सगळ्या गौराया गल्लीच्या प्रत्येक उंबऱ्यात हजेरी लावणार. चार घरं आटोपली की पुन्हा घरी जायचं, पुढची ताटं भरून पुढच्या घरांत जायचं. निदान ८-९ घरी तरी ताटं दिल्याशिवाय त्यांना घरात सण खाताना बरं वाटणार नाही.
आणलेल्या ताटांमध्ये तीळ पेरून थापलेली बाजरीची भलीथोरली राखाडी खरपूस भाकरी, त्यावरच वाढलेले झणझणीत कांदा लसूण मसाल्यातल्या लेकुरवाळ्या भाजीचे, दाणा दाणा वेगळा असलेल्या अख्ख्या मुगाच्या चविष्ट कोरड्या उसळीचे, याचा तोल साधणाऱ्या मुगातांदळाच्या पिवळ्या सपक खिचडीचे वाटे, तिथंच जागा करून चमचाभर दाण्याची आणि कारळ्याची भरड चटणी, एका कांद्याची पूर्ण पात, एक बारकं गुलबट देशी गाजर, बारकासाच गुळाचा खडा, चुकूनमाकून एखाद्या भाकरीवर लोण्याचं बोट असा बेत असतो. आपुलकीनं आणि आठवणीनं शेजारापाजारात केली जाणारी ही वाटणावाटणी आणि ताटं बघूनच जीव हरखतो.
आता जेमतेम अडीच माणसांच्या घरात ८-९ भाकरींची ती चळत ठेवून घ्यायचीही पंचाईत आणि परत द्यायचीही. त्यात बाजरीशी बिल्कुल सख्य नसणारे, घरच्या नैवेद्याच्या पानालाही शास्त्रापुरती चांदकी लावणारे आम्ही बापलेक. आम्हाला स्वारस्य त्या चवदार भाज्या-उसळी-चटण्यांमध्ये. यावर तोडगा म्हणून प्रत्येकीला एकेक चतकोर तुकडा ठेवून घेते म्हणलं तर सगळ्याच जणी - बरंय, तिची चतकोर ठेवा, माझी अख्खी घ्या बघा - असली प्रेमळ, आणि टाळणं जीवावर आणणारी गळ घालणार. बरं, ताटांमध्ये परत फिरून घालायला आमच्याकडची गोड्या मसाल्यातली गुळमट भाजी कशाला खातात त्या, आणि इतकी वाटण्यासाठी एवढाली भाजी करतंय कोण!
मग ही ताटं येणार याची कल्पना असल्यानं आधीच केलेली गुळाची पोळी त्यावर रवाळ तुपाचा गोळा ठेवून तिथल्या तिथंच ताटात घालून ती ताटं त्यांना परत करायची. कोरडी भाकरी अख्खी उचलून घेतल्यामुळं खाली ताट स्वच्छच असतं. दुसऱ्या दिवशी संक्रांतीला घरची तीळाची वडी नाही तर लाडू हातावर ठेवला जातो. या कुणी गुळाची पोळी, वडी किंवा लाडू करणाऱ्या नसल्यामुळं आपल्याकडून तेवढीच वेगळ्या पदार्थांची देवाणघेवाण. न संपलेल्या भाकरींची चळत सकाळी डुलत डुलत माना डोलावत गळ्यातल्या घंटा वाजवत दारावरून कळंब्याच्या पाण्यावर जाणाऱ्या म्हैशींच्या मुखी द्यायची.
मुद्दा असा की त्या भाज्यांमुळं माखलेली ती भाकरी स्वर्गीय लागते. भाजीच्या अंगच्या ओलाव्यानं फक्त पापुद्रा जरासा भिजलेली, कोरड्या उसळी-चटण्यांचा वरवर पुसट लेप लागलेली. कुणी स्वतः केलेले तर कुणाच्या सासूनं रांधलेले हे पदार्थ. प्रत्येकीची करण्याची पद्धत निराळी, हाताची चव निराळी.
त्यातल्या त्यात मुगाच्या उसळीची कंसिस्टंसी जरा मिळतीजुळती. मी पूर्वी अशी कोरडी उसळ करायची नाही. मुलाला ही भाकरीवरची उसळ आवडल्यावर अशीच ठिसूळ, प्रत्येक मूग वेगळा राहील अशी शिजवून उसळ करायला लागले. खरंतर पोळी-भाकरीत धरून अशा टणटण उसळीचा घास धडपणे उचलता येत नाही, शिवाय खातानाही तोठरे बसल्यासारखं वाटतं. पण त्या कंसिस्टंसीची चव छानच लागते हेही खरं. तिची सर एरवी मऊ शिजवतो त्या मुगाला नसते. कधीकधी तर मुग शिजून इतके शरण येतात की झुणकाच होतो मुगाचा. या पुरणाचे गोळे भरून विनासायास मुगाचे पराठे लाटायचे मग.
बाकी भोगीच्या लेकुरवाळ्या भाजीला किंवा उंधियोला घरात एकटदुकट माणूस असून उपयोगी नसतं. भोगीसुगी घोळामेळानंच साजरी व्हायला हवी. नाही तर गेलाबाजार अशी गल्लीत वाटता येईल आणि हौसेनं खातील अशी माणसं तरी पाहिजेत. त्या बेताला आणि मेहनतीला न्याय देणारे शिलेदार हजर असले तर सगळा घाट घालण्यात मजा. काय म्हणता!
Monday, January 5, 2026
अविनाश चव्हाणांनी निरोप घेऊन आज वट्ट दहा वर्षं झाली. परवा पुस्तक मेळाव्यात वॉल्डन प्रकाशनाच्या दालनात शेजारी कुणीतरी सात सक्कं त्रेचाळीस चाळताना दिसलं तेव्हा नगरकरांचा हा कट्टर पंखा आठवून हसू आलं. आठवणींची छान छान असोसिएशन्स असतात.
पण समीकरणं केवढी बदलतात एका दशकात. आता Ashok Patil वर्षाकाठी जेमतेम एखाद्या वेळी भेटीची वेळ देतात, तेही गेला बाजार ४-५ लेखी मेसेज, निदान २-३ व्हॉईस नोट्स आणि किमान १-२ फोनचा रतीब घातल्यावर. यंदा दिवाळीत तर त्याचाही काही उपयोग झालेला नाही. वाचन वेल्हाळचे सगळे सदस्य आपापल्या व्यापांमध्ये व्यग्र झाले, स्थलांतरं झाली. आणि हे होणं स्वाभाविक आहे.
मग मामा, पुन्हा केव्हा भेटायचं चव्हाणांची मापं काढायला? यावेळी जरा दयामाया करू त्याच्यावर. पुढचं पुस्तक कोणतं भेट देताय मला?
Subscribe to:
Comments (Atom)