तू टाळलंस तरी ऐकू येतंय अरे सद्गृहस्था.
एक किताबों पे खर्च करने में तुमको... (मौत आ जाती है!) पुढे सावरून घेतलंस.
हो की नाही?

पुस्तकं खरेदी करून वाचायला हवीतच, ते अधिक चांगलं आहेच. पण पुस्तक वाचायला मागण्याची अनेक कारणं असू शकतात, त्याबद्दल एवढं जजमेंटल होण्याची आवश्यकता नाही.
जागेची अडचण, पैशांची अडचण, वाचनाची आवड नाही पण एखादं पुस्तक वाचावंसं वाटू शकतं, खूप पुस्तकं घेत असते पण एखादं संग्राह्य वाटत नाही मग निदान एकदा वाचून तरी होईल, एखाद्याला वाचायला सुरुवात करायची असेल आणि तो तुमच्याकडून आयुष्यात पहिल्यांदा वाचायला पुस्तक नेणार असेल आणि तुम्ही काही तरी चांगलं सुचवण्याची त्याला अपेक्षा असेल, समोरची अगदी भरभरून बोलत असते आणि ते पुस्तक अनायासे तिच्या जवळ असतं म्हणून मागितलं, असं कितीतरी निघेल.
अत्तरं, कपडे वगैरे आताच्या पांढरपेशा समाजात जरा बऱ्या वावरासाठी जवळपास गरज होऊन बसली आहे. पैसे कमी असले तरी आता त्यावर काही प्रमाणात तरी खर्च करणं भाग असतं. पुस्तक ही काही जीवनावश्यक बाब नाही. पण कपडे आणि दर्शनी व्यक्तीमत्व तरी नीटनेटकं असल्याशिवाय आपण ना नोकरी व्यवसाय मिळवू शकू ना तो देऊ शकू. दिवसभराच्या घामट धावपळीत अत्तरं, परफ्युम्स वातावरण जरा सुसह्य करतात. घामेजलेला, कसेतरी कपडे चढवलेला अवतार करून चालायचं नाही. कितीही नाकारलं आणि तत्वज्ञान झाडलं तरी पुस्तक हे कव्हरवरून जोखलं जाणारच, जातंच. प्रकाशक काय वेळ जात नाही म्हणून मुखपृष्ठावर वेगळा वेळ खर्च करतात का! रॅकवर चटकन लक्ष वेधून घेईल आणि उचलून उघडायचा मोह होईल, हाच तर पहिला कटाक्ष असतो. तीच बाब माणसांना लागू.
पुस्तकं न वाचणाऱ्या लोकांना कमी लेखूच नये मुळात. पुस्तकं न वाचणारे करतात त्या हजार गोष्टी पुस्तकात डोकं खुपसून बसलेल्यांना येत नसतात. शिवाय तुम्हाला पुस्तकांची आवड, तशी त्यांना अत्तरं, कपडे, हॉटेलिंगची. ताशेरे कशाला झाडायचे? मागितलं तर नका देऊ, वाटल्यास फणकारून देत नाही म्हणा, बाकी कशाला बोलावं!
स्वत:च्या संग्रहाचं कौतुक असावंच. का नसावं, वर्षानुवर्षे केलेली मेहनत असते, पायपीट असते, चिकाटी असते, खिशाला चाट लावून संग्रह उभे केलेले असतात. पण चॉकलेट गोळ्यांच्या पारदर्शक बरण्या मांडून ठेवायच्या आणि गोळी पाहिजे म्हटलं की तुम्ही नावं ठेवणार. असं कुठं असतं होय?
पुस्तक मागितलं तर उलट चांगली गोष्ट आहे की. त्या मागणाऱ्यासाठी आणखी एक आनंदाचं दार उघडून देताय तुम्ही. बिनधास्त मागावं वाचायला, काही लाज वाटण्याचं कारण नाही. जबाबदारीनं परत करणं महत्त्वाचं, पण ते उसन्या घेतलेल्या कोणत्याही वस्तूला, पैशाला लागू आहे, नुसत्या पुस्तकालाच नव्हे. मी पुस्तकं मागते, वाचते, व्यवस्थित वेळेवर सुस्थितीत परत करते. माझीही इतरांना देते, कितींदा शिफ्टिंग केलं तेव्हा शेकडो वाटून टाकली. कित्येक हरवली, कित्येकांनी नेतो म्हणून परत आणून दिली नाहीत, कितीतरी जणांनी वाईट अवस्थेत परत केली. एकदा तर एकांनी 'तांबडफुटी'चं मुखपृष्ठच टरकावून वर वर्तमानपत्र गुंडाळून न सांगता परत केलं होतं. ते आहेत इथं मित्र यादीत. हे वाईटच आहे, पण सगळेच असं करत नाहीत हेही खरं आहे. उडदामाजी काळे गोरे असायचेच. आणि त्यांनी असं केलं म्हणून त्यांच्या बाकी गोष्टींवर फुली मारावी, असंही गरजेचं नाही. काही वेळा अपघातानं, अनवधानानंही नुकसान होतं. चालायचंच.
माणसांना जोखणं नो नो!
काही म्हणा, पुस्तकांचा संग्रह करणाऱ्यांना जसा आदर मिळतो समाजात, तेवढा ते स्वतः मात्र बाकी जगाला फार कमी वेळा देताना दिसतात. खरंतर ते वाचनामुळे प्रगल्भ दृष्टीकोनाचे असणं अपेक्षित असतं आणि बाकी जगही तसं मानत असतं. असं असताना बरा वाटत नाही असा कद्रूपणा.
https://www.facebook.com/reel/3704006099864191