म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, June 28, 2024

 कानावर कडाकडा बोटं मोडली या चिमुरडीसाठी मी.

ऐन कोल्हापुरात म्हणजे शिवाजी रोडवर गंजी गल्ली परिसरात वाढूनही मी असं कोल्हापुरी बोलू शकत नाही. असं सोडा, साधं नेहमीचं कोल्हापुरीसुद्धा माझ्या तोंडात कधी बसलं नाही. मीच कशाला, आमच्या घरातलं कोण पण कोल्हापूरी बोलत नाही. बहिणाबाईंकडनं अपेक्षा करता येती अजूनही, खरं तो पडला लहरी महंमद.
तसं ठरवलं तर मी पण बोलू शकतोय, सोडा. बोली आणि अगदी शिव्यांसकट ठेवणीतला शब्दसंग्रह वगैरे सगळा ऐवज आहेच की खजिन्यात. खरं हा हेल, तोरा आणि ठसका कुटनं आणू!
लेकानं तरी पहिल्यापासनं तो लहजा उचलला, नशीब. शाळेच्या पहिल्याच दिवशी कुणाला तरी आडगं ठरवून रिक्कामा झालेला बहाद्दर. आणि आवडीनं बोलतंय ते तसं, हे विशेष.
मी पण गंज चढू ने म्हणताना कधीतरी आवसंपुनवंला तसं बोलतोय, खरं लेक नाकं मुरडू मुरडू म्हणतो, ए नको गं बाई तू कोल्हापुरी बोलू, अजिबात शोभत नाही तुझ्या तोंडी😢
दु:क्कं हाय वो ह्ये, काय सांगायचं आता तुमानी😒
ते न्हवं, ही बारकी तुमच्या कुणाच्या वळकीची असंल तर कोण तर तिच्या आईला सांगा जावा तिची दिष्ट काडायला😘 जलमभर अश्शी बोलत ऱ्हा म्हणावं, कोण काय नावं ठिवली तर खड्ड्यात जाऊं दे तेनास्नी.
हितं आमी लोकांना बोलवू बोलवू रेकॉर्ड करून घ्यायलोय असली बोलणी! काय वणवा का काय म्हणायचा आता हा!
#reel currently not available. कोल्हापुरातली एक चिमुरडी अभ्यास करताना ताईशी ज्या लहजात बोलतेय, अभ्यास का जमत नाही ते सांगतेय, ते अतिशय लोभस आहे.

Thursday, June 27, 2024

 नमस्कार,

मराठी बोलीभाषा नमुन्यांच्या संकलनासाठी पुण्यात तरूणांइतकेच नववृद्ध आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर यावेत अशी आम्हाला अपेक्षा आहे. ज्यांचे पालक ६०+ वयाचे, हिंडतात फिरतात आणि उत्साहानं उत्स्फूर्तपणे बोलू शकतात त्यांना मनापासून विनंती आहे, की त्यांनी आपल्या पालकांना आवर्जून या उपक्रमासाठी पाठवावे. मराठी भाषकांनी एआय आणि मशीन लर्निंगला आपापल्या मातृभाषेच्या लहजातलं खुद्द आपलं बोलणं आपल्या मुखातून खाऊ घालण्यासाठी हा सहभाग असणार आहे, जो मोलाचा आहे. ध्वनीमुद्रण असल्याने काही रीतसर सोपस्कार, तंत्र समजावून सांगणे आणि प्रत्यक्ष ध्वनीमुद्रण यासाठी हाताशी किमान तीनेक तास ठेवून या, मार्गदर्शनासाठी आमचे सहकारी उपस्थित असतील. फुलाच्या पाकळीइतके मानधन मिळेल, जे त्यांना रिक्षासाठी तरी निश्चित उपयोगी होईल.
- बाया कर्वे हॉस्टेल, एस एन डी टी महाविद्यालय, पुणे
- २९ जून ते १० जुलै, पूर्ण दिवसभर
- AI4Bharat, IITM Chennai यांचा उपक्रम
उत्स्फूर्त बोलणे, वाचन आणि संवाद अशा तीन प्रकारे, AI4Bharatने तयार केलेल्या स्वतःच्या 'कार्य' या ऍपवर हे ध्वनीमुद्रण होणार आहे. विषय आणि प्रश्न दिले जातील. हा उपक्रम राज्य घटनेत नमूद असलेल्या २२ प्रादेशिक भाषांसाठी इतर राज्यांमध्ये देखील चालू आहे. महाराष्ट्रातील काही जिल्हे झाले, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे. एका अर्थी हे देशकार्य आहे. बोलीभाषेची विविध रुपं आणि तेवढाच वैविध्यपूर्ण शब्दसंग्रह जमा व्हावा, हा हेतू आहे.
अवश्य या, आवर्जून या.
जय हिंद जय महाराष्ट्र 🌼🌼

Thursday, June 20, 2024

 जागतिक संगीत दिन.

संगीत रस सुरस मम जीवनाधार

जीवसंरक्षक साधन.
हवा, पाणी, झाडं, अन्न, वस्त्र, निवारा, संगीत, पुस्तक, मनुष्यप्राणी आणि आता इंटरनेटही.


Saturday, June 8, 2024

 #नियोजन #सोय #पूर्वतयारी #भाजी #व्यवस्थापन

चिरलेल्या भाज्या, दळलेली कोरडी पीठं, वाटलेली ओली पीठं आता सर्रास सगळीकडे तयार मिळतात. लहान गावांमध्ये सुद्धा मिळत असावीत, कारण बहुतांश सगळीकडच्याच नोकरदार स्त्रिया आता वेळेच्या व्यवस्थापनाचा आणि होणाऱ्या दगदगीचा ताळमेळ गांभीर्यानं घालायला लागल्या आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. सुपरमॉम सिंड्रोम जेवढा लवकर संपेल तेवढं चांगलंच.
माझी यासंदर्भातली एक छान आठवण आहे आणि तशा माझ्यासारख्या भरपूर जणी निघतील म्हणून ती आठवण इथं शेअर करावीशी वाटली.
साधारण १९९८ ते २००० ही दोन वर्षं मी चिरलेल्या भाज्यांचा रतीब लावला होता. लग्न नुकतंच झालेलं, आमच्या दोघांच्याही नोकऱ्या, घरात दोघंच. नवऱ्याला सकाळी साडेसातची शिफ्ट असायची. शिक्षण नोकरीनिमित्त बरीच वर्षं आम्ही दोघं पण खानावळीत जेवलो असल्यामुळे नाश्ता आणि दुपारचं जेवण घरचंच, दमदमीत, संपूर्ण हवं असायचं. भुका पण सणसणीत होत्या. तेव्हा आमच्याकडे फ्रिज नव्हता. त्यात स्वयंपाकघरात फार वेळ घालवण्याची आम्हाला दोघांना तितकी आवड नव्हती.
त्या वेळी फक्त आशिर्वाद किंवा पइल्सबरीचे आटे मिळायचे, घरगुती पीठं नवी नवी उगवायला लागली होती. एकदा बैठक घालून पीठं दळून आणणे आणि आयतं आणणे, याचं कामाच्या पायऱ्यांचं, जाणाऱ्या वेळेचं, पैशाचं आणि महत्त्वाचं म्हणजे ऊर्जेचं त्रैराशिक नवऱ्याने मांडून दाखवलं की आयती पीठं हा व्यवहार्य उपाय आहे आणि त्या बदल्यात कुणाला तरी रोजगार मिळतोय. आवडलं नाही तर काय आवडलं नाही ते सांगायचं, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दर्जा चांगला ठेवतीलच उत्पादक. तेव्हापासून आजतागायत सगळी पीठं विकतच आणतेय.
तेव्हाच हा आयत्या निवडलेल्या भाज्या घरपोच मिळण्याचा पर्याय मिळाला आणि आमच्या सॉलिड पथ्यावर पडला. अप्पा बळवंत चौकापाशी रहाणाऱ्या भुसारी नामक कुटुंबानं हा नावीन्यपूर्ण व्यवसाय सुरू केला होता. आश्चर्य म्हणजे केवळ आमच्या एकाच घरासाठी ते पार विठ्ठलवाडीत एवढ्या लांब रोज संध्याकाळी न चुकता भाजीचं आणि कोशिंबिरीचं पाकिट देऊन जायचे. दर महिन्याला रू. २०० असा त्यांचा दर होता, जो आम्हाला तेव्हा परवडत होता. अफलातून सोय झाली होती आमची.
काय काय असायचं या सोयीत! दर महिन्याच्या एक-दोन तारखेला ते त्या संपूर्ण महिन्याचं छापील भाजीपत्रक आगाऊ द्यायचे. एका पाम्फ्लेटवर सोम-शनि सहा दिवस कोणकोणत्या भाज्या आणि खाऊचा पदार्थ मिळणार याची तारीख-दिवसवार यादी असे. शक्यतो एक भाजी दोनपेक्षा अधिक वेळा येणार नाही हे बघत. कोशिंबिरीच्या तयारीची वेगळी यादी नसायची. भाज्या ठरवताना त्या ऋतूतल्या, सणाला लागणाऱ्या, मोठा एखादा उपास आला तर त्याच्या आणि उपलब्धतेनुसार पण भाज्या ठरवलेल्या असत.
यामध्ये रोज पाव किलो भाजीचं एक आणि कोशिंबिरीच्या तयारीचं एक, अशी दोन नीटपणे बंद केलेली प्लास्टिकची पाकिटं यायची. फळभाजी असल्यास फोडी, पालेभाजी असल्यास निवडून. ते पालेभाज्या सुद्धा चिरून देत, पण मी नको सांगितलं होतं. सगळ्या फळभाज्या, शिरा काढून मोडलेल्या शेंगभाज्या, मोडाची कडधान्यं असायची. शिवाय फळभाज्या निरनिराळ्या प्रकारे चिरून यायच्या, म्हणजे कधी गोल तर कधी उभे काप, कधी मोठे तुकडे तर कधी बारीक चिरून वगैरे. शेवग्याच्या शेंगा सोलून एकसारखे तुकडे करून. पालेभाज्यांबरोबर सोललेल्या लसणाच्या सहा सात पाकळ्या. अळूच्या भाजीबरोबर थोडासा चुका आणि त्याच पाकिटात कोपऱ्यात बारक्या पिशवीत भिजवलेली हरभऱ्याची डाळ, भिजवलेले शेंगदाणे, ओल्या खोबऱ्याच्या कातळ्या यायच्या. हा जामानिमा तर प्रचंड सुखाचा होता. सर्वात फायदा म्हणजे या सगळ्या भाज्या पूर्ण वजनाच्या मिळायच्या. आपण बाजारात भाज्या विकत घेताना वाया जाणारा भागही त्याच वजनात धरला जातो, उदा. फ्लॉवर. पण तसं इथं व्हायचं नाही. स्वच्छ, नीटस भाज्या यायच्या. कधी कीडीचा तुकडा आलाय, माती तशीच आहे, जून शिळी भाजी पाठवलीये आणि तक्रार करावी लागली असं काही झाल्याचं आठवणीत नाही. कोशिंबिरीची तयारी म्हणून रोज कोणत्या तरी तीन गोष्टी असत. म्हणजे गाजरं, टोमॅटो, काकड्या, बीट, सॅलडची पानं, मुळे, तांबडा भोपळा किंवा यातलं काहीही कॉम्बो. पण हे अख्खं यायचं. त्याचं चिरून, खिसून, वाफवून जे काय करायचंय ते आपलं आपण.
कांदे बटाटे वेगळ्या पाकिटात यायचे. त्यांचा काय हिशोब होता ते आता नेमकं आठवत नाही, पण भाजीपत्रकात कांदे बटाटे नसायचे.
प्रत्येक शनिवारी बदल म्हणून कोथिंबीर वडीचे किंवा अळूवडीचे उकडलेले मुटके, ढोकळा/इडली/डोश्याची/मेदूवड्याची ओली पीठं, थालीपीठ भाजणी, मोकळ्या तिखटासाठी भिजवून वाटलेली डाळ असे काही ठराविक पण छान प्रकार द्यायचे. उपास वगैरे यायचे तेव्हा रताळी, सुरण वगैरे यायचं. एकदा बटाट्याचा वाळवलेला खिस पण आला होता बहुतेक. ही कल्पना माझ्यासाठी अगदीच अभिनव होती तेव्हा. खरंतर तयार भाजीचाच सगळ्यांना अचंबा व्हायचा तेव्हा, जी खरीच गोष्ट होती.
शनिवारी सुट्टी असायची, जी आमच्यासाठी रविवारी होई. पण शनिवारच्या निराळ्या पदार्थाच्या खाऊचं पाकिट शुक्रवारच्या भाजीबरोबरच पाठवलं जाई. सोमवारची भाजी रविवारी संध्याकाळी द्यायला लागायची म्हणून साप्ताहिक सुट्टी ते शनिवारी घ्यायचे. मार्केट यार्ड शनिवारी बंद म्हणूनही शनिवार सुट्टी सोयीची असणार त्यांना. सकाळी भाज्या आणणे, निवडणे, दुपारी चिरणे आणि दुपारनंतर डिलिव्हरी असं त्यांचं रुटीन होतं. संध्याकाळी आम्ही पोचायच्या आधी दाराला लटकवलेल्या पिशवीत भाजी आलेली असे. जो आधी घरी येईल त्यानं पाकिट उघडून भाजी भांड्यात काढून हवेसाठी फट राहील अशी झाकून ठेवायची. पालेभाजी धुऊन चिरून ठेवायची.
या सोयीमुळे रोज भाजी काय करायची या आद्य प्रश्नातून सुरुवातीपासूनच सुटका झाली. पुढे रतीब बंद केला तरी आजतागायत हा प्रश्न पडला नाही. या महिन्यात कोणत्या भाज्या पोटात जाणारेत ते आधीच माहीत असायचं, आमच्याकडे सतत वर्दळ असायची तर येणाऱ्या भाज्यांनुसार नियोजन करता यायचं, डब्याची कधी हेळसांड झाली नाही, घरी येताना ओझी वहाणं, रस्त्यात मधे थांबत थांबत येणं वगैरे करावं लागलं नाही. संध्याकाळी उंडारताना, सिनेमे बघताना, वर्किंग डे दिवशीसुद्धा बिनधास्तपणे गप्पांचे अड्डे टाकताना डोकं शांत असायचं. एखाद्या दिवशी भाजी जमणार नसेल तर पिशवीत चिठ्ठी असायची किंवा ऐनवेळी काही अडचण आली तर दोन चार वेळा मला ऑफिसमध्ये तसा फोन आल्याचं आठवतंय.
असं सगळं छान छान असलं तरी यामुळे बाजारात जाऊन भाजी घेण्याचा, रेंगाळत हिरवेगार ढीग बघत डोळे निवडण्याचा मोठा आनंद कॉम्प्रमाईज करावा लागत होता. गप्पा मारत निवांतपणे भाजी निवडण्यातली मजा मिळेना. शिवाय महाग भाज्या जशा स्वस्त पडत तशाच स्वस्त भाज्या महागही पडत. आम्ही तोवर घरही बदलण्याच्या बेतात होतो. अशा कारणांनी मग दोन पूर्ण वर्षं बसलेली ही घडी मोडावी लागली. पण त्यांनी अंगवळणी पाडलेलं नियोजन सुरु राहिलं. रविवारी सकाळी चार दिवसांची भाजी आणून दोन तास फतकल मारून सगळी निवडानिवड करून फ्रिज लावून ठेवायचा. किंवा ऑफिसला जाताना नेहमीच्या भाजी मावशींकडे भाज्या बघून आज काय पाहिजे ते निवडायला सांगून ठेवायचं, घरी परतताना ती घेऊन यायचं. त्यासाठी दोन रुपये चढ द्यायचे. त्याही खुश, आपणही खुश. दोन दिवस पालेभाज्या, मधले दोन दिवस फळभाज्या आणि शेवटचे दोन दिवस कडधान्यं, रविवारी साधं काहीतरी. रविवारी दमायचं नाही. शनि-रवी जास्तीची कामं काढायची नाहीत. स्वच्छता रोज थोडी थोडी करायची. तसंही रोज केवढी तरी धावपळ असतेच, त्यातच ऐंशी तिथं पंच्याऐंशी जमवायचे कसंही करून. अर्थात हे सगळ्यांना जमेलच असं नाही. ती माझ्यासारख्या उरकाउरकी क्लबच्या सदस्यांची खासियत आहे. माझ्या मते, सुट्टी ही आराम करून पुढच्या आठवड्यातल्या कामासाठी ताजंतवानं होण्यासाठी असते.
ते आयतं सुख असं अधेमधे आठवायला फार आवडतं मला. तुमच्यापैकी कुणी तेव्हा हा रतीब घेत होतं का ते जरूर सांगा. तेव्हा भुसारींचा मोघमच पत्ता माहित होता. पुढे त्यांनी व्याप वाढवला का, आताही ते हा व्यवसाय करतात का याबद्दल काहीच कल्पना नाही. पण संधी मिळाली तर तेव्हा ते त्यांना नेमकं कसं काय परवडत होतं, हे मला नक्की विचारायचंय त्यांना!

Thursday, June 6, 2024

 श्रीमुखात खावी लागावी एवढं लोकांना चीडीला आणू नये. राजकीय मंडळी उर्मट आणि अभ्यासहीन उथळ वक्तव्यांना आवर घालतील अशी एक अंधूक आशा आहे.

पण कुणीतरी कुणाच्या तरी श्रीमुखात भडकावण्यानं जो जल्लोष दिसतोय तो हिडीस आहे. भल्या भल्या आणि जेन्युईनली आदरणीय लोकांना आपले वैयक्तिक स्कोअर्स सेटल झाले असल्यासारखं व्यक्त होताना पहाणं अनाकलनीय आहे.
हिंसेच्या - कोणत्याही मार्गाने होणाऱ्या - समर्थनाचा निषेध.