म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, September 29, 2024

 ८८ वर्षांच्या कर्तबगार बंधूराजांनी लाडक्या ऋषितुल्य बहिणीच्या आठवणी सांगितल्या, तिची गाणी गाऊन घेतली, तिच्या आवडीचे स्वादिष्ट पदार्थ जेवू घातले आणि तिचा ९५ वा वाढदिवस साजरा केला.

या कार्यक्रमात संजीवनी भेलांडे लक्षवेधक होती. विभावरी जोशी आणि मनिषा निश्चल सुरेख गायल्या. अजीत परबांनी गाणी आणि लय चुकीची निवडून अनपेक्षितपणे निराशा केली. मात्र संजीवनीनं अर्धा कार्यक्रम एकटीनं पेलला, जवळपास उचलून धरला. थोडंफार निवेदनही तिनं स्वतःच केलं, पण सलग सव्वा तास बऱ्यापैकी अवघड गाणी गाऊन तिनं तिचं पारितोषिकही योग्य असल्याचं दाखवून दिलं.
सत्कार आणि पारितोषिक समारंभ ठीकठाक होते. भोजनाचा बेत मात्र खरोखरच उत्तम आणि विचारपूर्वक ठरवलेला होता. दीदींच्या आवडीचे तसे रग्गड पदार्थ असतील, पण त्यातले निवडक आणि उपस्थितांमध्ये ज्येष्ठ नागरिक भरपूर असणार हे लक्षात घेतलेलं होतं. आपण घरी करतो तशी उकडलेल्या बटाट्याची भरपूर कढीलिंब घातलेली तांबड्या तिखटातली भाजी, हिरव्या वाटणातली चवदार काजू मटार उसळ, सौम्य तोंडली भात, खुसखुशीत कोथिंबीरीची वडी, कुरडया, पुऱ्या, अतीगोड नसलेलं आम्रखंड आणि साजूक तुपातली, खाववेल अशी माफक गोड जिलेबी. अजिबात मसाले नसलेले पूर्णपणे घरगुती मराठी पद्धतीनं रांधलेले पदार्थ वाफाळते होते. हवेत चांगला गारवा होता, त्यामुळे या जेवणाची लज्जत वाढली. पंडितजींनी आवर्जून भोजनाबद्दल सांगितलं आणि ते तसंच होतंही, म्हणून हा वर्णनाचा प्रपंच केला.
सहा सात तासांच्या कार्यक्रमात शेवटचे तीन तास पंडितजींनी सूत्रं हातात घेतली. कार्यक्रम संपेतोवर ते थकून गेले होते. खरंतर यातल्या बऱ्याच आठवणी त्यांनी एबीपी माझा कट्ट्यावर पंधरा दिवसांपूर्वीच सांगितल्या होत्या. ते नुसते उपस्थित राहते तरी पुरेसं होतं. हयातभर त्यांनी चिक्कार काम केलंय, तेही सगळी ऊर्जा पिळून काढणारं, चिरंतन राहील असं. ते काम शक्य तितक्या प्रकारे रसिकांपर्यंत पोचवण्याचेही जीवापाड प्रयत्न केलेत. आता त्यांनी ही कार्यक्रमांची धावपळ कमी करावी आणि आराम घ्यावा. दीदी गेल्यापासून त्यांची तब्येत बरी नव्हती. आताआताशा त्यांनी उभारी धरली आहे. आम्हाला ते जास्तीत जास्त हवे आहेत, त्यांनी स्वतःला जपावं ही कळकळीची विनंती.


Saturday, September 28, 2024

 दिनांक १३ जुलै पासून आकाशवाणीवर दर शनिवारी रविवारी दुपारी १२ ते १ असा तासभर 'लता स्वरोत्सव' आणि 'गाए लता' हे प्रभा जोशी Prabha Joshi यांनी अतिशय शोधक वृत्तीनं आणि मनोभावे सादर केलेले कार्यक्रम प्रसारीत होत आहेत, ज्याची उद्या दुपारी सांगता होईल.

याबद्दल किती लिहावं आणि किती नको अशी भावना आहे, पण खुद्द निवेदनात प्रभाताई शब्दांची उधळपट्टी करत नसताना इथे ते प्रयोजनच उरत नाही. वर्षानुवर्षं आकाशवाणी ऐकताना त्यांनी यापूर्वी वेळोवेळी सादर केलेल्या अनेक मालिका म्हणजे आनंदाची लयलूट असायची. पण लताच्या समग्र गायनाचा मर्यादित भागांमध्ये आढावा घेणाऱ्या त्यांनी साध्य केलेल्या या महाकठीण मालिकेला वाखाणावं तेवढं थोडं आहे. कोणतंही भक्तीमय वर्णन टाळून निव्वळ अभ्यासाधारित वस्तुनिष्ठ निवेदन हे या संपूर्ण कार्यक्रमाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.
हिंदी मराठी सिनेसंगीत तर नेहमीच ऐकलं जातं, पण प्रादेशिक आणि गैर-फिल्मी गीतांचा सहभाग कमालीचा सुखद होता. आज के महावीरांच्या किंवा गालिबच्या, तमिळ आणि पंजाबी रचना ऐकताना डोळे परमानंदानं घळघळत राहिले आणि काहीही न करता कृतकृत्य वाटलं. आज जरी सगळं काही युट्युबवर सहजी उपलब्ध असलं आणि ऐकलं जात असलं, तरी ते एका लडीत पुढेमागे सुरस शास्त्रीय माहितीची मोजकी जोड देऊन आणि मराठीतली उत्तमोत्तम विशेषणं सार्थपणे वापरून मांडणं हा केवळ प्रत्यक्ष श्रवणाचा अनुभव आहे.
प्रभाताई, 'लता-संगीत रस सुरस मम जीवनाधार' असणारे आम्ही लोक तुमच्या ऋणात राहू. ही खरड केवळ तुम्हाला दिलेली एक अभिप्रायवजा पावती आहे.
ता. क. २०२३ साली केलेल्या मुंबई सोलो सहलीत प्रभू कुंज या तीर्थस्थळाचं दर्शन हा पहिला थांबा होता. आमचं परमसुखनिधान.


Friday, September 27, 2024

 Goodbye Maggie Smith

🌹
You were awesome.
सगळ्याच भूमिकांमध्ये.
आणि हो, तुझी डॉवेजर काउंटेस नक्की पुणे ३० मध्ये जन्मली असणार, नंतर इंग्लंडात गेली बहुतेक!

Thursday, September 26, 2024

 आज सकाळपासून विविध भारतीवर महेंद्र कपूरांची गाणी वाजतायत. स्मृतिदिन आहे. त्यावरून केव्हातरी बघितलेलं हे मोहनलालांनी गायलेलं गाणं आठवलं.

महेंद्र कपूर आवडतात. हिंदी आणि मराठी, दोन्हीकडे. बाकी भाषांमधली ऐकली नाहीत. अनेकानेक उत्तम आणि विविध प्रकारची गाणी आहेत त्यांची, दादा कोंडकेंसाठी गायलेल्यांसकट. पण हृदयनाथ मंगेशकरांनी गाऊन घेतलेली खास आहेत. आरती प्रभूंची प्रतिभेबद्दल लिहिलेली 'ती येते आणिक जाते' पुष्कळ लोकप्रिय आहे. पण भटांची 'पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी' ही गझल क्वचित ऐकू येते.
खूप जणांना महेंद्र कपूर आवडत नाहीत. हे इंटरेस्टिंग आहे. रविंद्र पिंगे स्वतःला दुसऱ्या फळीतले प्रथम दर्जाचे लेखक म्हणायचे, तसं काहीसं महेंद्र कपूरांबद्दल वाटतं. याउलट तलतनं मोजकी आणि तसं पाहता ठराविक पठडीतली गाणी गाऊनही तो पहिल्या फळीतला गायक गणला जातो. तलतही आवडतो, पण त्याला मर्यादा आहेत हे झालंच.
असो. मोहनलालांनी चांगलं गायलंय 'नीले गगन के तले'. तसं बऱ्यापैकी ठोकळेबाज आहे ते गाणं. त्याबद्दल मल्याळीत आधी ते काय सांगतायत शोधलं नाही. ऑडियन्स मध्ये पुष्कळ हूज हू दिसतायत.
https://www.facebook.com/reel/506982935231756

Friday, September 20, 2024

 अलीकडेच हे वाचलं. मला अजूनही ठरवता येत नाहीये की ते मला आवडलं की नाही. एवढा गोंधळ आजवर कधीही उडालेला नाही.

पूर्वार्ध वाचताना विचित्र भावना होती. अघोचरपणा, बेजबाबदारपणा, का ही अवदसा आठवावी इथपर्यंत पुष्कळ विचार मनात येऊन गेले.
उत्तरार्धात ही भावना थोडी उणावली. पुरती गेली असं म्हणता येणार नाही. लेखिकेच्या अनुभवांनी एक कंफर्ट येत जातो, मी घटनांना सरावत गेले म्हणूनही असेल, पण वाचताना बरं वाटायला लागलं. काही घटनांमध्ये छानही वाटलं.
तरीही संपूर्ण पुस्तकभर एक वरवरची व्हाईब जाणवत राहिली. वास्तविक विषय अतोनात गंभीर. प्रवास अत्यंत जोखमीचा, त्यातून एकल आणि स्त्रीचा. ज्या ज्या संवेदनशील संवेदनशील म्हणून गोष्टींशी आपली एरवी निरनिराळ्या स्वरूपात गाठ पडत राहते, त्या एकजात सगळ्या या पुस्तकात एकत्र आलेल्या आहेत. पण..! पुस्तक पूर्ण करून हातातून ठेवलं तरी मी या सबंध खटाटोपानं अजिबातच कंव्हिन्स झाले नाही, अपेक्षित गांभीर्य कुठं जाणवलंच नाही. ते अपेक्षित नको होतं का, हेही ठरवता येईना मला.
तसं बघायला गेलं तर मी संकुचित विचारांची नाही. एकल प्रवासाच आता नवा उरला नाही. पण तरीही हा प्रवास पटला नाही. बेफिकीरी वाटली. एवढं करून लहानपणचा एक प्रसंग रिव्हिजीट केल्याला स्वप्नपूर्ती म्हटलंय, जो संपूर्ण खटाटोपाचा मूळ अजेंडा नव्हताच. एलओसीवर जाणे आणि प्रत्यक्ष अनुभव घेणे या जोरदार ऊर्मीतून संपूर्ण प्रवास केला गेला. जी माझ्या मते क्षणिक म्हटली पाहिजे, कारण आधी तिचा काही मागमूस नव्हताच. आपण जेव्हा संसार मांडतो आणि स्वखुशीनं मुलं जन्माला घालतो, तेव्हा भारतीय समाजापुरतं बोलायचं झाल्यास ती संपूर्ण स्वावलंबी झाल्याशिवाय संसारावर निव्वळ स्वतःच्या लहरीखातर बोळा फिरवू शकेल अशी जोखीम पत्करणे कितपत व्यवहार्य होतं हा प्रश्न पडला आहे. वारीला पूर्वी लोक घरावर तुळशीपत्र ठेवून निघायचे, असं ऐकलंय, एका अर्थाने तो प्रकार. पासपोर्टादी कागदपत्रे अनोळखी लोकांच्या हातात कोण देतं, देईल का कल्पना नाही. मी फक्त हतबुद्ध होऊन वाचत गेले. काही विपरीत घडलं असतं, आणि ते घडण्याची शक्यता पुष्कळ होती, तर काय, या विचारानं मीच घरच्यांच्या भुमिकेत शिरले होते. त्यांची म्हणजे इकडं आड तिकडं विहीर अशी परिस्थिती होती.
लेखिका सुखरूप परतली म्हणून या सगळ्या मुद्द्यांचं महत्त्व कमी होत नाही. चांगल्या विचारानं निघालीये तर चांगलीच माणसं भेटतील हा भाबडेपणा अगदीच पचनी पडला नाही, प्रत्यक्षात खरोखरच चांगली माणसं भेटत गेली, तरीसुद्धा. वाचताना प्रत्येक प्रसंगात केवळ घरातल्या प्रेमळ माणसांचाच विचार येत राहिला.
खरंतर मी जजमेंटल होण्याचा काडीचा संबंध नाहीये. माझं आपलं देणं ना घेणं अन् फुकटचं कंदील लावणं चाललंय हे.


Monday, September 9, 2024

 ऋषीची भाजी

#ऋषीपंचमी #वृषभपंचमी
काल पहिल्यांदाच ऋषीची भाजी केली. सगळे प्रकार मिळून साधारण वीसेक भाज्या घेतल्या. दिनेशनी Dinesh Shinde लिहिलेल्या पद्धतीत उपलब्धतेनुसार आणि चवीनुसार थोडेसे बदल केले.
काळे पोलीस आणि पांढऱ्या घेवड्याच्या शेंगांचे दाणे, ऊसावरच्या शेंगा, श्रावण घेवडा, तांबडा माठ आणि देठं, भाजीचा अळू आणि देठं, राजगिरा, आंबट चुका (अर्धी जुडी), आर्वीचे कंद, सुरण, कच्ची केळी, रताळी, मक्याची कणसं, तांबडा भोपळा, दुधी भोपळा, पडवळ, घोसावळं, जाड काकडी या भाज्या आणि वाटीभर कच्चे शेंगदाणे घेतले. यापैकी शेंगांचे तुकडे आणि दाणे काढणं हे आधल्या दिवशी केलं. मीठ, काळ्या आणि पाणीदार दोन्ही मिळून ओल्या मिरच्या, ओलं खोबरं वाटून घेतलं. त्याशिवाय थोडी नुसती ओली मिरची मीठाशी वेगळी खरडून ठेवली.
सुरणाचे तुकडे, अळू आणि चुका हे चिंच घालून वेगळे शिजवून मग अळू चुका घोटून घेतले, चिंच काढून टाकली. तांबडा भोपळा मायक्रोवेव्हमध्ये वाफवला. आर्वी, रताळी आणि कणसं मीठ घालून वेगळी उकडली. हिरव्या शेंगांचे तुकडे, कच्चे शेंगदाणे, निवडलेले कोवळे दाणे, पालेभाज्या आणि सगळ्या फळभाज्या थोडं मीठ घालून एकत्र शिजवल्या.
सगळ्यात शेवटी एका मोठ्या भांड्यात हे सगळं एकत्र केलं. चिंच घातली, मिरची खोबऱ्याचा वाटलेला गोळा लावला आणि मीठाचा अंदाज घेऊन चव सारखी केली. आधणाचं पाणी घालून कंसिस्टंसी सरसरीत ठेवून भरपूर रटरटवली. घरात भरपूर ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे चव फार झणझणीत ठेवली नाही. तिखट हवं असलेल्यांनी मीठाशी खरडलेली ओली मिरची लागेल तशी घ्यावी म्हणून वेगळी वाटून ठेवली. वाढून घेताना वरून तूप आणि लिंबू पिळून घेतलं.
थोडेसे जे बदल केले ते म्हणजे उकळी येऊन काही वेळानं चव सेट झाल्यावर भाजीची दोन व्हर्जन्स केली. एक भाग बेसिक भाजी. दुसरा भाग कंटेंपररी भाजीचा केला. थोडी धणेपूड, जिरेपूड, थोडा गूळ घालून तिला तुपजिरेहिंगाची उभी फोडणी दिली. रात्री काकूनं पुन्हा थोड्या भाजीला नुसत्या तांबड्या तिखटाचीही फोडणी दिली, तर माझ्या मुलानं खाताना बेसिक भाजीत सोलापुरी शेंगा चटणी घालून भाजी खाल्ली, चांगली लागली. नुसती खाताना लोणच्याचा खार किंवा लोणच्याचं तेल, मोहरीचं तेल, जवसाची किंवा कारळ्याची चटणी वगैरे अनेक चवींची भर घालता येईल.
भाजी चांगली झाली असं घरच्यांनी, मुख्य म्हणजे मुलानं सांगितलं. काका आणि आत्या तर एवढी भाजी बघून चिंतेत पडले की ही संपणार कशी. प्रत्यक्षात मात्र सगळ्यांना थोडी थोडी देताना आमच्यासाठी राखून ठेवायची वेळ आली.
चार वर्षांपूर्वी दिनेश आणि आम्ही कोल्हापुरात शेजारी राहत असताना त्यांनी केलेली भलीमोठी ऋषीची भाजी आम्ही चार दिवस चापत होतो. जसजशी ती मुरत गेली तशी अधिक चवदार होत गेली. त्यांनी पारंपरिक पद्धतीनं सगळं एकत्र शिजवत घातल्यामुळे ती अर्थातच जास्त चविष्ट होती. मी सगळं वेगवेगळं उकडून घेतल्यामुळे चवीत फरक पडला हे माझं वैयक्तिक निरीक्षण, बाकी सगळ्यांनी पहिल्यांदा खाल्ल्यामुळे त्यांना चांगली वाटली.
त्याआधी आणि नंतर कुणी कुणी केलेली वाटीभर चमचाभर अशीच चाखली होती, आमच्या घरी कधी कुणी केली नव्हती. पंचमीला रविवार आल्यामुळे as a family exercise सगळ्यांनी मिळून करू, असं मी घरच्या ग्रुपवर जाहीर केलं. पण बरेचसे शिलेदार आडवे असल्यामुळे फक्त धाकट्या काकूनं हिरवा कंदील दाखवला आणि तीही सुरसुरत होती तरी गोळी घेऊन माझ्या हौसेसाठी बरोबरीनं तिनं सगळं केलं. एकटी करत बसले असते तर खात्रीनं एखाद्या टप्प्यावर माझा उत्साह मावळला असता कारण मला खटाटोप नको असतो. पण काकूमुळं कंटाळा आला नाही.
याउलट दिनेशना जात्याच आवड, उत्साह आणि उरक आहे. ते एकहाती करतात सगळं. भाज्या गोळा करताना कोल्हापुरातले सगळे भाजी बाजार आणि उपनगरी भाजी विक्रेते त्यांनी पालथे घातले होते. मला भाजी आणणे आणि निवडणे अशी आधल्या दिवशीची तयारी आणि दुसऱ्या दिवशी दोघींनी मिळून चिराचिरी, प्रत्यक्ष रांधणे एवढा वेळ लागला. फुले मंडईत भाज्या एकत्र मिळत असतील तर कल्पना नाही, कारण या दिवसांत त्या भागात कधी जाणं होत नाही. जेवताना उंधियोची आठवण आली सगळ्यांना. उंधियो जसा सगळे मिळून करतात, तशी ऋषीची भाजीही एका परिसरातले मित्रमैत्रिणी किंवा शेजारी मिळून करायला हवी.