उन्हाळ्याची धग वाढायला लागली. पेरीना, फेमिलाची आठवण आली. ऐन रणरणत्या दुपारी मंजुळ आवाजात कडेला टांगत्या दोरीची घंटा किणकिणवत जराशा ढोबळ्या बुटक्या बंदिस्त, शुभ्र पांढऱ्या असल्यामुळं उन्हात झळझळणाऱ्या स्वच्छ हातगाड्या बघूनच गार वाटायचं. मोहक आकाराच्या, कुठंही टोक नसणाऱ्या अशा गोलाईदार गाड्या पोरांना डोळ्यासमोर ठेवून डिझाईन केल्या असणार नक्की. ही दोन्ही नावं पण खूप गोड, फेमिनाईन आहेत. त्यावरची रंगीबेरंगी अक्षरं, तसंच आतलं रंगीत पाकिट, त्यात आईस्क्रीम कांडी. बहुतांश व्हॅनिलाच खाल्ल्याचं आठवतंय. इतर प्रकार होते का?
कोल्हापुरात एकुणातच आईस्क्रिमची जशी क्रेझ आहे, तेवढी इतरत्र दिसत नाही. बसून खायची सोय असलेली भरपूर संख्येनं आईस्क्रीम पार्लर्स, जागोजागी दिसणाऱ्या मेवाडच्या उभ्या आणि फिरत्या गाड्या, पेरीना, फेमिलाच्या हातगाड्या हे सर्रास चित्र आहे, होतं. असं गल्लोगल्ली दारोदार आईस्क्रीम घेऊन फिरणाऱ्या हातगाड्या आता कमी झाल्या काय? पेरीना, फेमिलाचं आकर्षण ओसरलं काय?
मिलन हॉटेलसमोरून लक्ष्मीपुरीत जायच्या रस्त्यावर एका ठिकाणी त्या हातगाड्यांचा घोळामेळा दिसायचा, तिथं त्यांची फॅक्टरी होती की वितरण केंद्र?
कोल्हापूरच्या या आईस्क्रिम संस्कृतीबद्दल माहितगारांनी सखोल सांगितलं तर बरं होईल. पाटील, सोळंकी, तृषाशांती, मेवाड, पेरीना, फेमिला, एम्पायर-इंपिरीयल, गारेगारची परंपरा सगळ्या कोल्हापूरकरांकडून पाळली जाते. यातच राजमंदिरनंही आपली जागा निर्माण केली आहे.
याबद्दल सगळ्यांकडून भरपूर वाचायला आवडेल. फिरत्या सफेद हातगाडीचे फोटो असतील तर शेअर करावेत.