म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Monday, July 17, 2023

#चवींच्याआठवणी #पदार्थांचेकिस्से

काल, १७ तारखेला आमच्या मोठ्या आत्याला ८६ वर्षं पूर्ण झाली. तिचं कागदोपत्री नाव विजया असलं तरी पूर्वीच्या सर्रास पद्धतीप्रमाणे तिला बेबी हे टोपणनाव आहे. नऊ भावंडातली ती एक नंबर. अद्याप एकही केस पिकलेला नाही. डोळ्याला चष्मा नाही. तल्लख बुद्धी आणि विलक्षण स्मरणशक्ती. अतिशय कर्तबगार व्यक्तिमत्त्व आहे तिचं.
आमची आजी (तिला ताई म्हणत) गेली तेव्हा आत्या २२ वर्षांची होती. आजी सुगरण या व्याख्येत बसणारी सुगरण होती, असं सगळे सांगतात. तिच्या सारखी गुळपोळी ती गेल्यापासून कधीच कुणाच्या हातची खाल्लेली नाही, असं बाबा दर संक्रांतीला न चुकता म्हणतात. खुटखुटीतपणा आणि परफेक्ट गोडवा, हे आजीला जाऊन एवढा काळ लोटला तरी अजूनही त्यांच्या व्यवस्थित लक्षात आहे.
साहजिकच ताईआजीचा स्वयंपाक आणि बऱ्याचशा पद्धती आजीचा सहवास जास्त मिळाल्यामुळे बेबी आत्याला माहित आहेत आणि लख्ख आठवतात.
धाकट्या भावंडांवर बेबीआत्याचा जीव आहे. धाकट्या काकानं तिला आजीसारखा मसालेभात करायला सांगितला होता. काका पंधरा दिवस बाहेरगावी होता तो काल परतायचा होता. मग तिनं जिन्नसांची प्रमाणासहीत यादी लिहून काढली, मधल्या काकाकडून ती सामग्री आणवून घेतली. आताशा आत्या दुपारी आंघोळ करते, पण शनिवारी सकाळी मात्र ती लवकर तयार झाली. शेंडेफळ नऊ नंबर आत्याला ओट्याशी उभं करून स्वतः जातीनं तिच्या शेजारी उभं राहून, ते जिन्नस मंद आचेवर भाजून घेऊन त्यांची पूड करून थोडा खमंग काळा मसाला तयार केला. काल तिचा वाढदिवस आणि काकाही गावाहून आला, तेव्हा तो मसाला वापरून सुग्रास मसालेभात तिनं तयार ठेवला आणि काकाला सरप्राईज दिलं.
आता हा मसाला जरा जास्त प्रमाणात करून आम्हां प्रत्येकालाही लवकरच मिळणार आहे.
तिचा हा उत्साह आणि ऊर्जा बघून नवल वाटतं. मसालेभात चवदार झालाच होता, पण तिनं या वयात मुळापासून सगळा खटाटोप करून तो रांधल्यामुळे जास्त चवीचा झाला. आत्याचं उत्तम आरोग्य, आनंद, हसतमुखपणा अबाधित राहो, ही सदिच्छा.
शनिवारी मी टिवल्या बावल्या करायला धाकट्या आत्याकडे डोकावले. ऐन ब्रंचची वेळ होती. उचकापाचकीचा चाळा म्हणून समोर ठेवलेला छोटा डबा उघडून बघितला तर त्या ताज्या दरवळानं आपोआप समाधानानं डोळे मिटले गेले. आत्तेबहिणीनं चहाचं आधण ठेवलं. ओट्यावर गरम पोळ्या चालल्या होत्या. आत्यानं लागलीच गरमागरम लुसलुशीत पोळी ताटलीत घालून पुढ्यात सरकवली. मी त्या पोळीला यथेच्छ तूप चोपडलं, चिमूटभर मीठासह तो ताजा घमघमणारा काळा मसाला पोळीवर भुरभुरला आणि ती गुंडाळी आयत्या वाफाळत्या चहाच्या घोटाबरोबर तल्लीन होऊन खाल्ली. खाताना एकीकडे आत्याकडून मोठ्या बहिणीचं कौतुक आणि मसाल्याची पार्श्वभूमी ऐकली. ब्रह्मानंदी टाळी लागायला एवढं पुरेसं असतं, नाही का?
ता‌.क. - मसाल्याची आणि भाताची रेसिपी विचारली आहे, मिळाली की इथे अपडेट करते.


No comments:

Post a Comment