म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, June 22, 2025

 आनंदी वृद्धत्व

उत्तुंग कर्तृत्व, सुदृढ मन आणि प्रसन्न वृत्तीचं, आमच्या आणि पुढील पिढीनं फॉलो करावं, असं एक उत्कृष्ट उदाहरण.
मराठीतल्या सर्वात ज्येष्ठ वैय्याकरणी प्रा. यास्मिन शेख यांनी काल वयाची १०० वर्षे पूर्ण करून १०१व्या वर्षात पदार्पण केले. अखंड हसऱ्या, आपल्या वावरानं भवताल प्रफुल्लित करणाऱ्या शेखबाईंनी आजवर तर भरपूर काम केलं आहेच, शिवाय आजही दिवसाला १०० पानं मुद्रितशोधन हा त्यांच्या कामाचा अफाट वेग आहे. डोळ्याला चष्मा नाही, दुपारी एका क्षणाचीही वामकुक्षी घेत नाहीत, सर्व दात शाबूत आहेत, स्मृती लख्ख जागी आहे. महत्त्वाचं म्हणजे मनात कामाबद्दलचा आणि जगण्याबद्दलचा आनंद आहे. आयुष्यातल्या त्यांना घडवलेल्या व्यक्तींविषयी, कुटुंबियांविषयी त्यांच्या मनात अतोनात कृतज्ञता आहे. अंतरंगात गाढ प्रेम आहे. बरेवाईट अनुभव चिक्कार आले असतील, ते कटू स्वरात आळवण्याऐवजी त्यांनी त्यांच्या स्वभावाला साजेशा मिश्किल विनोदाचा सूर धरला आहे. सहसा विद्वानांचा धाक वाटून बुजायला होतं, पण या विदुषीला नवशिकेही सहज शंका विचारू शकतात. Shobhana Tirthali ताईंच्या एका लेखात वाचलं की गाण्याचा जसा रियाज करतात, तसा आनंदाचाही रियाज करावा लागतो. म्हणजे काय ते बाईंच्या रुपात प्रत्यक्ष दिसतं.
त्यांच्यासारखं काम उभं करता येण्याची तरी शक्यता दिसत नाही. मात्र त्यांच्यासारखं मनानं आनंदी वृद्धत्व जमवता येईल, प्रयत्न, रियाज केला पाहिजे, असं निश्चित वाटलं.
हेच सगळं खरंतर शि. द. फडणीसांबद्दलही म्हणता येईल.
या दोन्ही ज्येष्ठांच्या जगण्याची शैली समजून घेतल्यास त्यांचं उचित अनुकरण करता येईल.
शेखबाईंनी काल द्विशतकी वाटचाल सुरू केली आहे, तर फडणीसांचा १०१वा वाढदिवस जुलै महिन्यात येतोय.
दोघांचंही मनापासून अभीष्टचिंतन.



No comments:

Post a Comment