बाथरूमसाठी अॅंटी स्किड मॅट्स
Anti Skid and Multipurpose Rubber Mats
सध्या आम्ही भाडेकरारावर रहात असल्यामुळे घरात काही कायमचे बदल करणं शक्य नाही. ह्या इमारती वीसेक वर्षांहून जुन्या आहेत, साहजिकच घरातल्या बाथरुम्सच्या फरशा अतिशय गुळगुळीत झाल्या आहेत. इतक्या की आतल्या आत साधं वळताना, दारातून आत पाऊल ठेवल्यावर, असा दोनदा माझाच पाय घसरला. घाबरगुंडी उडाली. आम्ही कुणी घरी नसताना बाबांना आंघोळीसाठी तर मनाई केली, पण बाकी वापर कमी करणं शक्य नाही. ह्यावर उपाय म्हणून आता आम्ही दोन्ही बाथरुम्समध्ये आणि घरात मधल्या, बेसिन असलेल्या पॅसेजमध्ये, ही मॅटस् अंथरली आहेत. त्यांना ग्रीप आहे, खालून पाणी वाहून जातं आणि स्वच्छ करता येतात. वजनाला अगदी हलकी आहेत, पाय ठेवल्यावर ओल्या गुळगुळीत फरशीवरुनही सरकत नाहीयेत. कोपरे किंवा कडा उचलल्या जात नाहीत त्यामुळे पाय अडकायची भिती नाही. त्यावर उभं राहिल्यावर तेवढ्या वेळापुरते तळवे अॅक्युप्रेशरसारखे दाबले जातात, ते बरं वाटतंय. बरेच दिवस घरी नसलो तर उचलून भिंतीला टेकवून किंवा हूकला अडकवून निथळवून कोरडी होतील. कपडे धुता येण्याएवढी जागा वेगळी सोडावी लागेल किंवा मॅट तेवढ्यापुरतं उचलून बाजूला उभं करावं लागेल. भांडी घासता येण्याची शक्यता मात्र कमी वाटतेय, कारण ओशटपणा आणि खरकटं अडकून राहील आणि स्वच्छतेची डोकेदुखी मोठी होईल. आमच्याकडे कपडे आणि भांडी दोन्ही तिथे होत नसल्याने तो प्रश्न येणार नाही. पुढे मागे घर बदललं तर मॅट्स उचलून नेता येतील. साधारणपणे वावर असतो, तेवढा एरीया कव्हर होईल अशा बेतानं आणली. आणखी वापरल्याशिवाय तोटे काही आहेत का, हे लक्षात येणार नाही. पण पाय घसरू शकेल असा सगळा एरीया शक्यतो कव्हर करावा.
तुम्ही अनेकजण वापरत असालच, पण सर्वांच्या माहितीसाठी शेअर करावंसं वाटलं.
ही रबर-पॉली मॅट्स आहेत. आम्ही पुण्यातल्या बोहरी आळीतून आणली, कोणत्याही हार्डवेअरच्या किंवा सिंथेटिक मॅट्सच्या दुकानात सहज मिळतात. वेगवेगळ्या आकाराच्या चार मॅटस्, बाथरुम्सच्या आकाराच्या अंदाजाने पण त्यांच्या बिंडातून कापून मिळाली. घरातली मापं नेल्यास, दुकानात बिंडाचा पन्हा बघून किती पाहिजे ते ठरवणं सोयीचं पडतं. कमोडच्या समोरच्या बाजूला मॅटचा स्वतंत्र तुकडा ठेवावा लागेल. ऑनलाईन उपलब्ध आहेत, त्यात वेगवेगळी डिझाईन्सही आहेत. पण फार स्वस्त नाही आणि पाच वेगवेगळे पत्ते दिले तरी आमच्या परिसरात डिलिव्हरी उपलब्ध नाही असं अमेझॉननं सांगितलं, का तेच जाणे. बाकी सगळ्या वस्तू पोचवतात. आधी सिंहगड रोडवरच काही दुकानांमध्ये चौकशी केली, दर बरेच महाग वाटले. बोहरी आळीत बऱ्यापैकी रास्त दरात मिळाली. अंदाजे २×५, २×४, २×३, २×१ असे तुकडे घासाघीस केल्यावर दोन हजारात मिळाले, जे आमच्या परिसरात चार ते साडेचार हजाराला सांगितले होते.
No comments:
Post a Comment