म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, February 26, 2023

 #स्वप्नवासवदत्तम् #पुणे

काल झालेल्या स्वप्नवासवदत्तम् या कार्यक्रमाचा अनुभव खूप प्रसन्न होता.
संस्कृतातल्या उत्तम नाट्यकलाकृती सर्वसामान्यांपर्यंत सुगमपणे पोचवण्याच्या स्तुत्य उपक्रमातली ही पहिली नृत्य-नाटिका, निर्माती दिग्दर्शक मुग्धा पोतदार-पाठकांनी भांडारकर संस्थेच्या सहयोगानं भांडारकर संस्थेच्या आवारातल्या अॅम्फी थिएटरमध्ये संक्षिप्त स्वरूपात सादर केली.
मुग्धा पोतदार-पाठक आणि पूजा मेहता या दोघी कुशल नृत्यांगनांबरोबर केवळ सहा महिन्यांत कथ्थकचे ढोबळ धडे घेऊन आत्मविश्वासानं वावरणारे कुणाल फडके लक्षवेधी आहेत. ओंकार शिंदेंचा यौगंधरायण आणि किंचित सूत्रधार मीठासारखा नेमका वाटला. उत्कृष्ट दिग्दर्शन, कोरस आणि रंगमंचाचा सुरेख वापर, सुरेल गाणी आहेत. सर्वांच्या एकत्र तराण्यानं तर मंत्रमुग्ध केलं. नाटिका नृत्याधारीत असूनही केवळ नृत्यावर केंद्रित नाही. ओपन एअर थिएटरच्या वातावरणानं, वडाच्या सळसळीनं, संध्याकाळच्या सुखद गारव्यानं आणि अधल्यामधल्या झुळुकांनी या सगळ्याचा एकत्रित परिणाम दामदुप्पट केला.
महाकवी भासाच्या या मूळ सहा अंकी नाटकाचं हिंदीतलं सुबोध रुपांतर डॉ सुनील देवधरांनी केलं आहे. संगीत निखिल महामुनी आणि आमोद कुलकर्णींचं आणि शाम भुतकरांचा वॉटर कलर्स-डिजीटल माध्यमाच्या एकत्र वापरातून केलेला बॅकड्रॉप आहे. या सगळ्याला उठावदार प्रकाशयोजनेनं साजेशी संगत केली आहे.
कार्यक्रमात एकदाही मोबाईल वाजला नाही, ही विशेष उल्लेखनीय बाब. संगीता गद्रेंनी मृदूपणे दिलेल्या सुरवातीच्या सिनॉप्सिसपासून शेवटपर्यंत प्रेक्षक अटेंटिव्ह होते. बरोब्बर वेळी येणारी किंवा न येणारी दादसुद्धा रंगत वाढवते. फार छान वाटलं. बादवे, भांडारकर संस्थेच्या आगामी अभ्यासक्रमांची छोटीशी झलक पुरेशी इंटरेस्टिंग होती, अनेकांना खात्रीनं स्क्रू लागले आहेत.
मला सहसा न्यून, तृटी दिसत नाहीत. काही असल्यास समीक्षक टीमपर्यंत पोचवतील. आम्हाला आलेला सुंदर अनुभव शेअर करावासा वाटला. आता प्रयोग नियमित होणार आहेत असं सांगितलं गेलं. तर प्रयोगांवर लक्ष ठेवा आणि अवश्य बघा असं सुचवीन.








Wednesday, February 15, 2023

 #summerrecipes #summerspecial #उन्हाळ्यातलेबेत

पेरूचं सरबत आणि त्यात घरात असतील त्या फळांच्या फोडी, चालत आवडत असेल तो सोयीचा सुका मेवा एवढंच आहे हे.
मी आयतं सरबत वापरलं, त्यात साखर जास्त असते. सरबतं घरी करणाऱ्यांना गोडवा बॅलन्स करता येईल. पेरू असल्यामुळे किंचित तिखट-मीठ किंवा थोडा चाट मसाला भुरभुरायलाही स्कोप आहे. आणखी कोणकोणत्या सरबतांचं असं कॉम्बिनेशन करता येईल तो विचार केलेला नाही.
खरंतर 'पोटाला शांत करणाऱ्या, कमी मसाल्यातल्या पण सॅलड, प्रोटिन कार्ब्सचा उत्तम संयोग असलेला मेनू' या निकषात बसणारं पेय नाही हे. पण उन्हाळ्यात करता येईल असं आहे.
Guava juice, combined with a variety of summer fruits and dry fruits.



Sunday, February 12, 2023

 #नवापूल #सोयी #गैरसोयी

२००१च्या फेब्रुवारीत आम्ही शिवपुष्प चौकात, आजच्या सनसिटी रोडला रहायला आलो. हा रोड आज एक महत्त्वाचा लॅंडमार्क आहे. २००३ला मित्तलांचा सनसिटी प्रोजेक्ट लॉन्च झाला. रु. ७५१ पर स्क्वे फूट अशी मोठाली होर्डिंग्ज बऱ्याच ठिकाणी लागली होती. या प्रकल्पानं पश्चिम आनंद नगराचं सगळं चित्र बदलून टाकलं. राजाराम पूलही साधारण तेव्हाच आगेमागे सुरू झाला, त्यानं या बदलाला आणखी वेग आला. अर्थात तेव्हा या बदलाचा अंदाज येणं शक्य नव्हतं. मारुती मंदिराच्या पुढे शेतं सुरू व्हायची, जिथे आज बॉटलनेक आहे. अंधार पडल्यावर तिकडे वाटमाऱ्या चालू झाल्यावर सनसिटीतल्या नव्या रहिवाशांनी अनेक महिने रात्री गस्ती घातल्या आहेत. मित्तलांनी पुरवलेली बससेवा वर्षभरानंतर बंद झाल्यावर, या जेमतेम एखाद किमी अंतरासाठी रहिवाशांना शिवपुष्प चौकात किंवा संतोष हॉल चौकात रिक्षावाल्यांनी यथेच्छ नाडून घेतलंय. आता भरवस्तीत आल्यामुळे जाणवत नाही, पण तेव्हा ते अंतर खरोखरच फार वाटायचं. मुख्य करून मध्यम वर्गीयांचा भरणा. चारचाक्या अपवादात्मक होत्या. त्रस्त ज्ये ना, दप्तरं वागवत तंगडतोड करणारे विद्यार्थी, तान्ही किंवा पाचाच्या आतली मुलं नेणारे आईबाबा, तिकडे कोणतीच दुकानं नव्हती त्यामुळे ऑफिस उरकून मग सगळी ओझी वहात दमून चालत जाणारे मध्यमवयीन सर्रास दिसायचे. यथावकाश पीएमटी सुरू झाली, लोकांनी घरामागोमाग गाड्यांची जुळवाजुळव केली, एकेक टप्पे पार होत गेले. आजची त्या परिसरातली वस्ती बघताना ते मूळ सनसिटी वसवणारे लोक आठवतात.
आमच्यासारख्या त्यामानानं अलिकडे रहाणाऱ्या लोकांसाठी तेव्हापासून शांतता, स्वच्छ हवा, सुरक्षितता संपुष्टात आली ती कायमची, आणि हेच धनलक्ष्मी सोसायटीसाठी व्हायला आम्हीही कारणीभूत झालो होतो. हा रस्ता अखंड वहाता असतो. त्याला रात्री १२ ते पहाटे साडेचार एवढीच उसंत. साडेचारला वर्तमानपत्रे आणि दुधाच्या गाड्यांची लगबग, पाठोपाठ शाळेच्या बसेस आणि रिक्षांची धावपळ सुरू होते. आमचा चौक या धामधुमीचं केंद्र आहे. आमच्या इमारतीखालीच बसस्टॉप आणि दर पंधरा मिनिटांनी शहरातील महत्त्वाच्या सगळ्या भागांसाठी बससेवा आहे. एकही बाब अशी नाही, जी त्या रस्त्यावर मिळत नाही.
आम्हीही सनसिटी प्रोजेक्टला विरोध करायला हवा होता का? मग आम्ही रहायला आलो तेव्हा धनलक्ष्मी सोसायटीनं विरोध केला तोही योग्यच होता ना? विकास हा फारच मोठा शब्द झाला, सर्वसामान्यांच्या दृष्टीनं या बेसिक सोयी आहेत. मी याच सिस्टीममध्ये राहून, तिचे मला हवे ते सर्व फायदे घेऊन एखाद्या सोयीला विरोध करते तो विरोध व्हॅलिड आहे का? त्या सोयी होणं चूक की बरोबर? हे चूक बरोबर कसं ठरवणार?
सिंहगड रोडवर पुलोद्यानासमोर होऊ घातलेल्या नव्या पुलाला विरोध होतोय. गेला आठवडाभर वातावरण तापलंय. त्यासाठीची प्रत्येकाची कारणं व्हॅलिड असतील, हे मान्य आहे. पण आपण जे इतर पूल आणि वाढीव रस्ते वापरतो, त्याचाही आधी कुणीतरी त्रास सहन केलाय, आजही करतायत. ते नसते तर होणारी गैरसोय आपल्यासाठी तेवढीच त्रासदायक झाली असती. थोडक्यात, शिवाजी शेजारच्या घरात जन्मावा, आमच्या नाही, असाच याचा अर्थ झाला. मित्रयादीतल्या माझ्या सगळ्या शेजाऱ्यांना आणि परिसरातल्या समस्त मित्रमंडळींना टॅग करायची इच्छा झाली. पण टॅगिंग मलाच पसंत नसल्यामुळे नाही केलं. एनीवे, हा पुलाचा प्रवास कसा होतोय याबद्दल उत्सुकता आहे. पूल झाला तर वापरणार. नाही झाला तरी पर्याय आत्ताही उपलब्ध आहेतच. त्यामुळे सध्या फुटपाथवर उभं राहून बघ्याच्या भूमिकेत. इथं प्रत्येकानं दुसऱ्याच्या छातीवर पाय दिलाय, त्यामुळे प्रतिक्रियेमध्ये तो दृष्टिकोन उमटल्यास भूमिका न्याय्य ठरेल.

Sunday, February 5, 2023

 हे सरता संपणार नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

🌹
या घरी क्वचित डोकावणारी उन्हं आज मुहुर्तावर उगवली. तीही कोवळी. आयुष्य साजरं आहे एवढं खरं.