उलटे लटकणारे सख्खे शेजारी
दारातच मोठा उंबर आहे. दारात म्हणजे, वाढलेला पसारा तिसऱ्या मजल्यावर दहा फुटांवर आहे. हाच उंबर बघून चोवीस वर्षांपूर्वी पहिल्या स्लॅबच्या टप्प्यावर घर बुक केलं होतं. उंबर आहे म्हणजे जमिनीत पाणी असणार या होऱ्यानं. तेव्हा पिटुकला होता, आता आसमंतात पसरलाय.
तर, यावर दहा वीस वटवाघळं कायमस्वरूपी मुक्कामी असतात. उंबर लगडलेलं असतं त्यामुळं अन्न मुबलक. किड्यांना कमतरता नाही. आणि घरच थाटलंय म्हणजे दिवसा झोप काढणं आणि रात्री जागत बसणं आणि एकमेकांशी यथेच्छ गप्पा मारणं आलंच. नाही तर जागत राहून दुसरं काम काय!
साधारणपणे पुरा काळोख झाला, की किचकिचाटाची गप्पाष्टकं चालू होतात. एवढा कोलाहल, की 'अरे, गपा' म्हणून खरोखरच दम भरावा लागतो कधी कधी. कारण खालून वाहणारा हमरस्ता आवाजाच्या चढाओढीत मागं पडतो. पण दिवसभर मात्र चिडीचूप. खाली डोकं वर पाय, या फांदीवरून त्या फांदीवर, आई बाबा पोरं पोरी सगळे उनाडत असतात, पण डोळे मात्र टक्क उघडे. की ते आमच्या हालचाली बघून उघडतात तेच जाणे. मी एरवी तशी भित्री भागुबाई आहे. 'बार्डोवी'वरच्या एका लेखात कुणीतरी काल केलेला 'हा खेळ सावल्यांचा' मधल्या नरसूचा आणि पार्श्वभूमीवर वाजवलेल्या आशाच्या आवाजाचा नुसता उल्लेख वाचूनही मला हुडहुडी भरलेली. सिनेमा बघून कैक वर्षं झाली तरी. पण या शेजाऱ्यांची कशी कोण जाणे भिती वाटत नाही. तीच बिचारी मला घाबरत असणार खात्रीनं. हा जरासा अतीपरिचयात अवज्ञेचाही प्रकार असेल.
अलीकडे एकदा दुपारी वाळलेले कपडे घ्यायला नील गच्चीत गेला आणि जाम दचकला. समोरच्या फांदीवरचे एक बाबा स्थिर नजरेनं त्याच्याकडंच बघत होते. मला हाक मारून दाखवलं तर जणू काही झापडं बंदच होत नसल्यासारखी आमच्याकडे टक लावली होती बाबांनी. दोन्ही हातांनी फांदी धरलेली आणि उलट्या डोक्याच्या डोळ्यांनी स्तब्ध नजरेनं आम्हाला बघणारं ध्यान आपण बेसावध असताना बघितल्यावर भीतीदायकच.
No comments:
Post a Comment