ही शहाणीशी छोटेखानी कादंबरी एका बैठकीत हातावेगळी केली आणि दसरा सत्कारणी लागला. आवर्जून वाचनीय आहे.
यामध्ये एका नाण्यानं घडवलेला एका किशोरवयीन मुलाचा सुरस प्रवास आहे. पण त्या प्रवासात सामान्य विज्ञान, परिस्थितीकी, नाणकशास्त्र, संग्रहालयशास्त्र, इतिहास, भूगोल, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, तसंच चवीपुरतं तत्त्वज्ञान आणि व्यवहारज्ञान येतं. याबरोबरीनं ग्रामीण आणि शहरी वास्तव दर्शन आहे. मैत्रीचे विविध पदर, पिढ्यांतर्गत वैचारिक तफावत, प्रत्यक्ष आणि व्यावसायिक नातेसंबंधांचे अनेक तऱ्हेनं डोकावणारे अंतर्गत प्रवाह, काही ठिकाणी अपरिहार्यपणे येणारी तांत्रिक माहिती, मुख्य म्हणजे जगरहाटी अतिशय व्यवस्थितपणे मांडली आहे. एवढुशा पुस्तकात हे एवढं सगळं खच्चून भरलेलं असूनही ते कुठेही कोरडं, रटाळ होत नाही. गंभीर वस्तुस्थितीची पार्श्वभूमी असूनही घटनांचं वर्णन बागुलबुवा सारखं अंगावर आणलेलं नाही. घडामोडींचं महत्त्व प्रस्थापित व्हावं पण त्याच वेळी त्यावर सखोल विचार व्हावा अशी योजना केलेली आहे. समकालीन आणि उत्कृष्ट भाषा, समकालीन महत्त्वाचे विषय, अतिशय जबाबदार हाताळणी, वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या चर्चा अशा अनेक बाबी विशेष जाणवल्या. संपूर्ण पुस्तकाचा तोल शेवटपर्यंत टिकला आहे, जराही भरकटत नाही. किशोरवयीन मुलांची दुनिया चितारणारी अनेक पुस्तकं आहेत, ही त्यातली एक दमदार भर आहे.
लेखिकेचं हे पहिलंच पुस्तक आहे असं प्रस्तावनेत लिहिलंय. तिची पार्श्वभूमी ललित लेखनाची नाही, पण लेखनातलं क्राफ्टिंग कौशल्यपूर्ण आहे. वाचताना अनेक ठिकाणी मी मनोमन लेखिकेची प्रशंसा करत राहिले. मीही परिस्थितीकीची विद्यार्थिनी असल्यामुळे जरा अधिक आत्मियतेनं आणि तेवढंच चिकित्सकपणे वाचलं गेलं. आणि हे अधिकाधिक लोकांनी आणि खरंतर पालकांनी तरी वाचायला हवं असं फार वाटलं.
बऱ्याच वर्षांपूर्वी मायबोलीच्या एका दिवाळी अंकात मी भूमिजा नावाची कथा लिहिली होती. त्यातली मुलगी शिक्षण झाल्यावर शहरातून परत येऊन घरची शेती करायला लागते. जीन्स गुडघ्यापर्यंत दुमडून ती भातलावणीसाठी चिखलात उतरलेली वगैरे दाखवली होती मी. ही कादंबरी वाचताना थोडी ती आठवण आली. स्वानंदी सरदेसाईचे व्लॉग्ज बघताना पण ती कथा आठवते. शिवाय उगीचच जराशी झाडाझडतीची आणि खैरनारांच्या शोधचीही आठवण झाली. असो.
No comments:
Post a Comment