#आरण्यक #बंगालीपुस्तकं #अनुवाद
स्वत:च्या अगदीच तुरळक खरडी मनापासून आवडतात, त्यापैकी ही एक. आणि त्याला कारण खुद्द 'आरण्यक'च!
ही खरड वाचताना असं वाटलं की एवढ्या मोजक्या शब्दांत आपल्याला बरं जमलं माववायला. पण तसंच हवं ना बहुतेक. मोहीनी जेवढी अधिक, शब्द तेवढे किमान व्हावेत.
यातल्या भरजरी श्रीमंत मराठीविषयी खूप बोलावंसं वाटतं, पण म्हणजे काय करेन कोण जाणे. 'ततुम्हाअ' मधला संवाद जणू माझ्यासाठीच, तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती वगैरे. त्यापेक्षा सोयीचं म्हणजे शं. बा. शास्त्रींच्या पायाशी माझा आपला पारंपरिक - पदर सावरत कंबरेतून वाकून दोन्ही हात जोडून बांगड्या किणकिणवून तीनतीनदा नमस्कार.
आणि मराठीतली तीन सुमधुर आणि लोकप्रिय नाट्यगीतं या शास्त्रींच्या नावावर आहेत, हे आज समजलं. सुखद आश्चर्य. गुगल करायचा कंटाळा कधी कधी नडतो, तो असा.
बाकी जगता जगता एकीकडे आपणच आपल्यासाठी मनभावन आठवणींची बेगमी केलेली असते, ती अशी.
No comments:
Post a Comment