जिव्हाळा - रामदास भटकळ
रामदास भटकळांचा त्यांच्या आप्तांशी नातेसंबंधांचा आणि दीर्घ मैत्रीच्या प्रवासांचा भटकळांच्या बाजूचा हा आलेख आहे. खोलवर घेतलेला. भटकळांच्या स्मृतीला दाद द्यावी लागते. प्रदीर्घ लेख आहेत. त्यात येत राहणाऱ्या काळाचा तुकडा चांगलाच मोठा आहे, अनुषंगिक संदर्भ महत्त्वाचे आहेत. संबंधित विषयापेक्षा त्यावर व्यक्त होणारं माणूस समजत जातं, या न्यायानं भटकळांचा प्रभाव जास्त पडला.
मी सहसा क्रमानं वाचत जाते, संपूर्ण पुस्तक आधी चाळून बघत नाही. त्यामुळे यात एकामागून एक येणाऱ्या व्यक्तिमत्वांनी सरप्राईज मिळत राहिलं. गंगाधर गाडगीळ, विंदा आणि दुर्गाबाईंवरचे लेख फार भावले. या तिघांबद्दलचा आदर वाढला. दुर्गाबाई आणखी भुरळ घालतात. कदाचित ही आधीपासूनच आवडीची माणसं आणि आलेले तपशील आपल्या स्नेहभावाशी मेळ खाणारे म्हणूनही असेल असं म्हणता आलं असतं. पण कोणत्याही व्यक्तीच्या आढाव्यात भटकळांनी दुजाभाव मुळात केलेलाच नाही. लेखक लोक माणसं म्हणून कशी असतात हे उगीचच हवं असतं मला, अनेक किस्से, प्रवाद ऐकलेले असतात. ते कुतूहल बऱ्यापैकी समाधानकारकपणे शमलं या व्यक्तीचित्रांमुळे. जरी एकच बाजू समजत असली तरी. तटस्थपणे मांडणीचा प्रामाणिक प्रयत्न दिसतो तरी.
त्यानंतर कुसुमाग्रज आणि ग्रेसांवरचे लेख आवडले. यात 'कुणाला कशाचं आणि .......चं' या उक्तीप्रमाणे पं. मंगेशकर आणि ग्रेस मिळून ग्रेसांच्या काव्यगायनाचा कार्यक्रम करत ही माहिती वाचून दोन कारणांनी काळजात कळ उठली. एक तर हे मला माहिती नव्हतं, नव्यानं कळलं आणि दुसरं ते ऐकणं हुकलं. सडं असताना सलग दहा एक वर्षं तरी खुळ लागल्यासारखं असेल तिथे भावसरगम आणि होतील ते जाहीर कार्यक्रम ऐकले आहेत. एनीवे, ते इथे महत्त्वाचं नाही. कानेटकर, बेडेकर दांपत्यावरचे लेखही चांगले आहेत, फक्त ते उगीचच माझ्या कक्षेबाहेरचे वाटत राहिले. म्हणजे संग्रहात आहेत म्हणून वाचले गेले, औत्सुक्य फारसं नव्हतं. ज्ञानेश्वर नाडकर्णी आणि तारा वनारसेंची फक्त नावंच ऐकली होती, त्यामुळे त्यांच्याशी यानिमित्तानं परिचय झाला असं म्हणता येईल.
यात वारंवार येणाऱ्या उल्लेखामुळे आता 'जिगसॉ'ही वाचावं असं वाटलं. पण लेखक तपशीलांमध्ये त्यांच्याबरोबर आपल्यालाही हाताला धरून इतके बुचकळून काढतात की काही ठिकाणी पुरे आता, मी जरा काठावरच पाय हलवत बसते, असं झालं. काय होतं, गोष्टीच्या पुस्तकासारखं नुसतंच वाचत सुटता येत नाही ना. येणारे इतर संदर्भ, इतर व्यक्ती आणि घोळमेळ, कालखंड लक्षात ठेवावे लागतात. एखादा धागा धरून मधेच मागे जाऊन काहीतरी आठवावं लागतं, कारण मनातल्या मनात आपण हे सगळे तपशील आपल्याही ज्ञात माहितीशी टॅली करत असतो. अशानं शिणायला होतं मग. वेग कमी झाला वाचण्याचा. मी बरेच दिवस घेतले हे संपवायला. पंचाईत म्हणजे फारही रेंगाळता येत नाही, नाही तर बाकीच्या धबडग्यात आधीचा मजकूर सपाट होतो आणि आणखी कष्ट पडतात. पण या सगळ्या कष्टांमध्ये आनंद आहेच.
वाचताना एकीकडे आपणही आपल्या प्रत्येक नात्यात आणि दीर्घ मैत्रीच्या प्रवासात डोकावून बघायला हवं, एक इंटरेस्टिंग एक्सरसाइज होईल असं वाटलं.
माझ्यापुरती एक चांगली गोष्ट म्हणजे यानिमित्तानं मी पुस्तकं पुन्हा विकत घ्यायला लागले. सोळा साली एका जिवलग आप्ताच्या आकस्मिक निधनानंतर त्याच्या मौल्यवान पुस्तकांची झालेली हेळसांड बघून धसकून मी स्वतःसाठी पुस्तकं खरेदी करणं जवळपास बंदच करून टाकलं. माझ्याच आत दडलेल्या किमानवादी माणसानं अगदी पुस्तकांचाही संग्रह नकोच ही सुप्त भावना सोयीस्करपणे उचलून धरली. आठ वर्षांत चित्रभास्कर, रंगभास्कर, वरदान रागाचे, वारसा प्रेमाचा असे मोजके तुरळक अपवाद, तेही जोमदार शिफारस किंवा त्या लेखकांमुळे केलेले. केवळ नीलसाठी आणि भेट देण्यासाठीच खरेदी होत होती आणि जिव्हाळा या दोन्ही कप्प्यांमध्ये बसत नाही. या पुस्तकामुळे 'मला वाचावंसं वाटलं म्हणून माझ्यासाठी घेतलं' हे चक्र पुन्हा सुरू झालं आणि सोबतीनं सोलेदाद, भटकंती वगैरे आणखी थोडी आवक झाली. Abhishek Dhangar, थॅंक्यु
No comments:
Post a Comment