रवा धिरडी
कशाचीही धिरडी घालणं हे केव्हाही पोळ्या/भाकरींपेक्षा सोयीचं वाटतं. मृण्मयी म्हणाली त्याप्रमाणे, एकदा तंत्र जमलं की निश्चिंती. कधी सगळी पीठं एकत्र, कधी सगळ्या डाळी एकत्र, कधी प्रत्येक पीठाचं वेगळं तर कधी सगळ्या मोडाच्या कडधान्यांचं एकत्र. कधी भाज्यांमध्ये दोन चार चमचे पीठं घालून तर कधी वरच्या सगळ्या प्रकारांमधे भाज्या घालून. हे सगळे प्रकार न आंबवता केले जाणारे. झाकण ठेवायचं किंवा नाही ते वापरलेल्या जिन्नसांनुसार. तर धिरडी वरचेवर होतात.
आज नुसत्या रव्याची केली होती. रवा दह्यात भिजवून पंधरा-वीस मिनिटं ठेवला. तो फुलून दाट होतो. पाणी घालून ओतीव कंसिस्टंसी केली. मीठ आणि इनो मिसळून तवा व्यवस्थित तापल्यावर लगेच धिरडी घातली. झाकण न घालता दोन्ही बाजूंनी नीट शेकली. इनो किंवा चिमुटभर सोडा नाही घातला तर थोडी दडदडीत होतात. आपण ह्याच मिश्रणाचे ढोकळे, आप्पे किंवा इडल्याही करतो, तसंच. प्रमाण आपापल्या अंदाजानं घेता येतं.
No comments:
Post a Comment