मी बारामतीकर मतदार. हिरीरीनं दोनच नावांवर लक्ष केंद्रित करून बसले होते. हा साक्षात्कार मला मी साक्षात इव्हीएम तथा व्हीव्हीपॅट समोर उभी ठाकल्यावर झाला. तिथे जवळपास पंधरा सतरा उमेदवार उपस्थित होते हे बघून मी कपाळाला हात लावला. नावं वाचत बसण्याची ती वेळ नव्हती आणि योग्य वेळ टळूनही गेली होती.
आणि मी म्हणे शिकली सवरलेली! जागरूक मतदार! कशाचं काय! माझ्या कल्याणासाठी कोण कोण लोक रिंगणात उतरले आहेत हे बघण्याचीही मी तसदी घेतली नव्हती. पण मी तरी स्वतःलाच एवढे बोल का लावून घेऊ? निवडणुकीला उभे राहिलेल्या त्या लोकांनी देखील आपापली उपस्थिती जाणवून देण्याचे कष्ट घेतले नाहीत, हे नमूद करायला हवं. कोणीही प्रचाराला फिरकलं नाही. घरून काम करत असल्याने कुणाची भेट हुकण्याची शक्यता तशी कमीच. प्रत्यक्ष उमेदवार किंवा काम करणारी माणसं राहोत एकवेळ (का राहोत पण!), निदान रिक्षा तरी फिरवता आलीच असती. मुख्य रस्त्यावर घर असल्यामुळे त्या घोषणा ऐकू न येण्याची शक्यताही नगण्यच. पण तेही काही कानावर आल्याचं आठवत नाही. झालाही असेल प्रचार, पण जोर यथातथाच असावा. बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांचे कार्यकर्ते मात्र पुन्हा पुन्हा येऊन भेटून गेले. साहजिकच चर्चाही त्याच रंगल्या.
पर्याय हवे आहेत आम्हाला. पण अस्तित्वसुद्धा न जाणवणारे पर्याय काय उपयोगाचे? निवडून येण्यात स्वारस्य नसेल तर निवडणुकीला उभे का राहिले तेच जाणे. हा खेळण्या आधीच हार मानल्यासारखा प्रकार झाला.
हेच चित्र पुणे मतदारसंघात दिसू शकेल. दोनच उमेदवारात ठळक चुरस असली तरी आणखी पुष्कळ इच्छुक नशीब आजमावत असतील, तिकडे लक्ष असू द्या, सुजन हो.
No comments:
Post a Comment