म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Monday, January 23, 2023

 अ डेट विथ तीर्थरूप. एक उनाड संध्याकाळ.

बाबांना पुण्यात येऊन आठ नऊ महिने होत आलेत. अधेमधे गावाकडं भरपूर मुक्कामाच्या, अगदी माहेरपणासारख्या फेऱ्या झाल्यात. आजारपण झालं, बाकी बारीक सारीक कुरबुरी असं यथास्थित आहे. इथला रोजचा दिनक्रम सुरळीत चालू असला आणि पुणं त्यांना मुळीच नवं नसलं तरी मनानं ते अजूनही तसे कोल्हापुरातच आहेत. ते इथं रुळण्यासाठी आणखी एखादं वर्ष सहज जाईल, तरीही मनातून ते कायम तिकडेच असतील, हे आम्ही गृहित धरून आहोत. त्यांचं आणि माझं तसं बघायला गेलं तर पटतच नाही, (हो, आता आहे बुवा तसं, काय करता) पण तरी तसं बरं जुळवून घेतो आम्ही एकमेकांशी. इरावती कर्वेंचा कित्ता गिरवत मीसुद्धा त्यांना म्हणते, की मी तुमची सून नाही ते किती बरंय! नाही तर मोकळेपणी वाद घालायचीही पंचाईत झाली असती. त्यात आणि घरात 'कल, आज और कल' परिस्थिती, मग आमच्या मधल्या पिढीचा जो ढोल होतो, त्याबद्दल कुणी विचारू नये आणि आम्ही सांगू नये. शांतम् पापम्.
तर अशा माझ्या आखाडसासऱ्यांना मी दर वीकेंडला म्हणते की एखादा सिनेमा नाटक बघू, गाण्यांच्या कार्यक्रमाला चला. नको, आम्हाला आवाज सहन होत नाही. एवढा वेळ एके ठिकाणी बसवत नाही. मग बाहेर फिरून येऊ, काही खाऊ, जरा पुणं भटकू. पण तेही सोपं नसतं. एकतर आता त्यांच्या वयोमानानुसार सकाळी लवकर पोट साफ होत नाही. साहजिकच त्याशिवाय निश्चिंतपणे निघता येत नाही, नाश्त्यासाठी भूकही जागी होत नाही. म्हणजे नऊ वाजून जातात. बाहेर पडायच्या अजेंड्यात सारसबाग/ कसबा गणपती /जोगेश्वरी किंवा गेला बाजार कोणतंही एखादं देऊळ अध्याहृत असतं, तर आंघोळीशिवाय त्यांचे उंबरे ओलांडायचे नाहीत. बरं, मग आंघोळ झाली की लगेच निघू, पूजा आल्यावर करा, तर तसं चालत नसतं. देवांना पारोसं ठेवायचं नाही किंवा आपण गाव उंडारून येऊन पूजा करायची नसते. राहिलं, मग एक दिवस मानसपूजा करा. असं म्हटलं की फणकारा येतो. मानसजेवण, मानसनाश्ता कराल का, मग मानसपूजाही जमायची नाही. झालं, एवढं उरकेतवर अकराचा ठोका पडायला येतो. त्यात सध्याचा गारठा, मग सगळंच उशिरा. कोल्हापुरात एवढ्या गारठ्याची सवय नव्हती, इतकी की यंदा ७८ वर्षात त्यांनी पहिल्यांदाच पूर्ण बाह्यांचा स्वेटर अंगाला लावून घेतला. माझी अकरालाही बाहेर पडायला हरकत नसते ,पण तोवर ऊन वाढतं आणि मुख्य म्हणजे साडेबाराला ते पानावर बसतात. बरं, मग संध्याकाळी तरी? नाही, साडेचार पाचपर्यंत ऊन असतं आणि मग सातच्या बातम्या गाठायच्या असतात. मग एकदोन मालिका, साडेआठाला घासभर जेवण की साडेनऊच्या हेडलाईन्स बघून दिवस संपला. कसं करावं? सुपर बिझी माणूस.
असे गृहस्थ अचानक, स्वैपाक तयार असतानाही चक्क साडेसात पावणेआठच्या सुमारास, आज काही करू नको, आपण बाहेर जेवून येऊ म्हणतात तेव्हा तापलेल्या तव्यावर चटदिशी पोळी भाजून घेणे एवढंच करायचं असतं. जेवण मी देणारे, चारशे रुपये घेतो, पुरतील ना? फस्सकन हसू आलेलं गिळलं (हो, तेवढ्यानं पापड मोडायचा!) आणि हो, पुरतील म्हणून विचार बदलायच्या आत बाहेर काढलं. अंगात काहीतरी घाला, पायमोजे घाला, निदान मफलर तरी गुंडाळा, तर कटकट करू नको गं, मला थंडी वाजत नाही असं डाफरत केवळ मफलरीवर बाहेर पडले. मी आपली इकडे स्वेटरमध्येही कुडकुडतेय. कुठं जाऊ या, भूक किती आहे, असं विचारत गाडीवरून रॅंडमली सारसबागेच्या वाटेला लागलो. मग सुरू झाली स्मृती सहल. मी वळले की ते आठवून तो रस्ता सांगायला लागले. सिंहगड रोड, सारसबाग, अभिनव चौक, मग बाजीराव रोडला गणराजला खूप वेटिंग, पुढचं वाडेश्वर बंद. शनिपार, तुळशीबाग चौक, लक्ष्मी रोड, नेपाळ्यांकडे कानटोपीची खरेदी. मग लकडी पुलावरून डेक्कन, फर्ग्युसन रोड, वाडेश्वर -रुपाली -वैशाली सगळीकडे तुफान वेटिंग. उजवीकडे वळून आपटे रोडमार्गे जंगली महाराज रोडवरही बहुतेक ठिकाणी वेटिंग, शेवटी एके ठिकाणी पार्किंग आणि बसायला जागा दोन्ही मिळाल्यावर जेवलो आणि त्यातलंही फार काही सरेना म्हणून अर्ध्याहून अधिक बांधूनच घेऊन पुन्हा डेक्कन, लकडी पूल, शास्त्री रोड, दत्तवाडीमार्गे घरी परत. रविवारी उशिराही गर्दीनं फुललेले रस्ते आणि ओसंडून वाहणारी दुकानं, हॉटेल्स बघून जरासे चकित झाले. प्रशस्त रस्ते बघून गावाकडच्या रस्त्यांबरोबर तुलना केली. रात्र असूनही वाटेतले आजुबाजुचे गावभाग आणि प्रसिद्ध ठिकाणं ओळखली आणि माझ्याकडून कौतुक करून घेतलं. म्हटलं तर आटोपशीर म्हटलं तर लांबचा फेरफटका मारून, त्यांना माहित असलेले प्रमुख परिसर फिरून आलो.
सगळा मिळून जेवून दिड तास. पण खुश झाले की एकदम. असा इंप्रॉम्प्टू बेत भलताच आवडला बाबांना. एरवी माझ्याकडून पान वाढायला साडेआठाचे आठ पस्तीस झाले तर कपाळावर आठी उमटणारे बाबा आज सव्वानऊ झाले तरी निवांत. एकीकडे मी आपली जरा चिंतेत की मजा घेता घेता उगीच थंडी बाधायला नको, तर त्यांनी उडवून लावलं मला. काही होत नाही गं, बघू काही झालं तर. म्हणजे, हे बरंय आपलं! पण असो, मुहूर्त न बघता असंच आणि त्यांच्या मनानं बाहेर पडणं केव्हाही बरं. जेणेकरून ते एंजॉय करतील आणि सरतेशेवटी ते सगळ्यात महत्त्वाचं, नाही का! कोल्हापुरात आम्ही दोघं असे भरपूर भटकायचो. कधी नदीवर, कधी रंकाळा, कधी कात्यायनी, कधी विद्यापीठ, कधी नातेवाईकांच्या भेटीगाठी, तर कधी नुसतेच गावाबाहेरुन घुमणारे गोल रस्ते. ते आवडायचं त्यांना.
तुम्हाला वाटेल हे काय पाल्हाळ लावलंय, तर खरंय मंडळी, हे काही नवं नाही. एरवी तक्रारी, गाऱ्हाणी करतो, ऐकतो, ते सगळं स्वाभाविक आहे. प्रत्येकाला व्याप, चिंता आहेत, देण्यासाठी स्वतंत्र वेळ काढता येत नाही. कुणालाच चूक बरोबर पारड्यात तोलता येत नाही. पण रोजच्या आयुष्यातला एखादाही प्रसंग थोडा चवबदल देऊन जातो, त्यांना वेळ देता देता आपण आपल्यालाही आपसूक वेळ देऊन जातो. म्हणून केवळ शेअर केलं.

No comments:

Post a Comment