आईला जाऊन अडतीस वर्षं होतील येत्या ऑगस्टमध्ये. साहजिकच आईचा आवडता पदार्थ सांगता येणं कठीणच. पण या थीमच्या निमित्ताने थोरल्या काकूकडून, बाबांकडून ऐकलेल्या गंमतीशीर आठवणी आल्या.
आईला लहानपणी साजूक तूप फार आवडायचं. इतर भावंडांपेक्षा तिला जास्त तूप वाढण्याचा ती हट्ट करायची. आजी अतिशय तापट होती. एक दिवस आई अशीच आणखी वाढ, आणखी वाढ करत असताना आजीनं चिडून तुपाचा अख्खा डबा आईच्या पानात पालथा केला! तेव्हापासून आईला तुपाची जी शिसारी बसली, ती तिनं पुन्हा तुपाला तोंड लावलं नाही म्हणे.
आई गोडघाशी होती असं ऐकत आले. ७३ साली रितसर ठरवून लग्न होऊन ती कोल्हापुरात आली. लग्नात जिलेबीचा बेत होता, जिलेबी संपली पण पाक उरला होता. आणि तो घरी आणला होता. घरात एवढं गोड आवडणारं इतर कुणीच नव्हतं. तर या नव्या नवरीनं आठ दिवस एकटीनंच खात तो पाक संपवला म्हणे! नवं घर, नवा परिवार, नवं गाव या सगळ्या ताणात ती जिलेबीचा पाक कशी काय खात बसली असेल याची राहून राहून गंमत वाटते. घरात शेंडेफळ असलेल्या आणि दहावी होऊन दोनेक वर्षात लग्न झालेल्या त्या मुलीला तेवढा पाचपोचही नसावा खरंतर. उलट आज विचार केला तर मला तिच्या धाडसाचं फार कौतुक वाटतं.
आईला अनारसेही फार आवडायचे. तेव्हा विकत मिळायचा तर प्रश्न नव्हताच. एके वर्षी दिवाळीत तिनं तांदूळ भिजवून कुटून आंबवून साग्रसंगीत सगळा खटाटोप केला. पण तळायला घेतल्यावर ते अनारसे तुपात हसायला लागले आणि तिला काही ते साधले नाहीत ते नाहीत. ही माझ्याच आठवणीतली घटना आहे आणि अनारसे हसतात म्हणजे बिघडतात हे त्यामुळेच तेव्हा मिळालेलं ज्ञान आहे.
आई उद्योगिनी होती. जबर महत्त्वाकांक्षी होती. माझी धाकटी बहीण फक्त सोळा दिवसांची असताना तिला घेऊन आई रेल्वेचा इंटरव्ह्यू द्यायला मुंबईला गेली होती. ती पोस्टाची पारितोषिक विजेती स्मॉल सेव्हिंग महिला एजंट असल्यामुळे खाते जमा गोळा करण्यासाठी रोज शहरभर भ्रमंती चालायची. लग्नानंतर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून, आमचे दोघींचे जन्म, शास्त्रीय संगीताचं शिक्षण, सातत्याने गाण्याचे कार्यक्रम आणि जीवावर बेतलेलं एक भयंकर आजारपण असं तिचं एकंदर आयुष्य आणि केवळ तेरा वर्षांचं सहजीवन. चाळीतल्या चौथ्या मजल्यावरचा एका खोलीतला संसार, पिण्याच्या पाण्यासकट सगळ्या सोयी तळमजल्यावर, त्या गैरसोयीतही माणसांचा अखंड राबता (मला आठवतंय, एकदा त्या दहा बाय दहाच्या खोलीत आमच्याकडे तिच्या माहेरकडचे सोळा जण पाहुणे येऊन उतरले आणि जोतिबा, नरसोबाची वाडी, औदुंबर अशी तीर्थयात्रा करत दोन तीन दिवस मुक्काम होता) शिवणाचाही क्लास लावला होता, काही काळ तिनं ताक विक्रीचा व्यवसायही केला. उभं राहून दोऱ्या ओढून प्रचंड मोठ्या रवीनं हंडे भरून ताक घुसळायचं, लोण्याचे गोळे वेगळे करायचे, ते शंभरदा पाण्यानं धुवायचे आणि लोक येऊन ते ताक आणि लोणी विकत घ्यायचे. हे कमी म्हणून स्वभावातला ओसीडी. पलंगपोसावर एक चुणी काय खपवून घेईल! कसे काय रहायचो त्या एवढुशा खोलीत याचं नवलच वाटतं आता. शिवाय बऱ्याचदा आईची आई आणि सगळ्यात धाकटा मामा पण आमच्याकडेच रहायला असायचे.
हे सगळं सांभाळून तेव्हाच्या काळानुरूप ती जरी सगळं घरी करायची तरी तशी तिला स्वयंपाकाची वगैरे फारशी आवड असल्याचं आता तिला आठवतानाही मला जाणवत नाही. तिच्या व्यापांमधून तिला स्वयंपाकासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ देणं गरजेचं वाटतही नसेल बहुधा. माझी वृत्ती तशी आहे त्यावरून हे माझं नुसतं अनुमान आहे. दिवाळीचा फराळ असो की रोजचा स्वयंपाक, जे असेल ते नेहमीचंच, पण सगळं ताजं. नवे पदार्थ किंवा इडली-डोसे असले बदल म्हणून केले जाणारे पदार्थ तिनं कधी केल्याचं स्मरणात नाही. पण बाबा तिच्या बऱ्याच जबाबदाऱ्या शेअर करायचे. तिची खाती गोळा करून आणणं, अधूनमधून स्वयंपाक करणं वगैरे. पोळ्या भाकरी सोडून बाकी सगळे पदार्थ बाबा उत्तम करतात, आणि आमच्या घरी आजोबा पुढारलेले होते, जे कोल्हापुरात तेव्हा दुर्मिळ होतं. त्याचा तिनं स्वतःच्या प्रगतीसाठी चांगला उपयोग करून घेतला. मलाही तिनं फार लवकर स्वयंपकाचे धडे आणि घरच्या कामांची जबाबदारी देऊन तयार केलं.
ती खसखशीचं वाटण लावून बटाट्याचा चवदार कुर्मा करायची. त्यातल्या बटाट्याच्या फोडी झाकणात पाणी ठेवून शिजवलेल्या असायच्या, त्यामुळे त्या फोडी पिठूळ ठिसूळ शिजून सगळा मालमसाला त्या फोडींमध्ये पुरता मुरलेला असायचा. त्या कारणानेच असावं बहुतेक, पण मला झाकणात पाणी ठेवून शिजवलेल्या भाज्या विशेष आवडतात. त्या शिजून मेण होत नाहीत आणि फोडींचा आकार जसाच्या तसा राहतो. तिचा हा एकमेवच पदार्थ मला लख्ख आठवतो. त्याचं रंगरूप, वास, अगदी कंसिस्टंसी सुद्धा त्या कढई आणि किचन टेबलसकट माझ्या लक्षात आहे. त्या कुर्म्याबरोबर पुऱ्या असायच्या. आश्चर्य म्हणजे कसा कोण जाणे, पण हा कुर्मा मी आजतागायत करून बघितलेला नाही. आता आईच्या आठवणींच्या निमित्तानं करून बघेन.
आईच्या संबंधी मी आणि धाकटी बहीण सातत्यानं बोलत असतो. एवढा प्रचंड काळ उलटला तरीही आमचे अनेक निरर्थक तर्कवितर्क, तिची कोणती वैशिष्ट्यं कुणी घेतली हे उहापोह आजही चालू असतात. केवळ एकतीस वर्षांच्या आयुष्यातला तिचा आलेख बघितला तर तिच्याबद्दल लिहिण्यासारखं प्रचंड आहे. असं असूनही आईविषयी मी आज पहिल्यांदा काही तरी लिहिलं.
No comments:
Post a Comment