स्वैपाक हा आवडीचा विषय नाही, तरी त्यावाचून गतीही नाही. म्हणून मग बाकी ऋतूंच्या तुलनेत हिवाळा सुखाचा वाटतो. भाजी बाजारातली रंगीबेरंगी रेलचेल, समस्तांच्या पोटात प्रसन्न भूक आणि लागल्यास दहांदा ताजं करायचाही उत्साह टिकवणारी स्वैपाकघरातली उब. दणाणा सायकली हाणणारे आणि तनामनानं फुटबॉल खेळूनही एरवी सतत 'भूक नाही'चं पालुपद लावणारे नव्या मनूतले नव्या दमाचे शूर शिपाई हिवाळ्यात मात्र खादाड असे माझी भूक चतकोरानं मला न सुख म्हणताना सापडतात तेव्हा क्रूरसिंगासारखं यक्कू करून खदखदत हसता येतं आपल्याला. हेच लोक गारठणं मान्य न करता एकीकडे आम्हाला समजत नाही असं समजून साळसूदपणे निमुट जास्त वेळ घरात बसतात, तेही हिवाळ्यातच. संध्याकाळी श्रावण सोमवारसारखं ताजंताजं आणि लवकर जेवून मुदपाकखाना बंद करून रात्री हॉट चॉकलेट नाही तर फोडणीच्या दुधाचा (हा कॅरॅमल मिल्कसाठीचा Maya Dnyaneshचा शब्द आहे) मग घेऊन रजईत गुरफटून एकेक घोट घेत समोर काही तरी भान हरपवणारं बघण्याचा किंवा वाचण्याचा आनंद हिवाळ्यातच.
हिवाळा लोभस असण्याची आपापली शेकडो कारणं निघतील म्हणा तशी.
प्रथिनं आणि माझी पचनशक्ती यांचं भलतं सख्य आहे, पण हिवाळ्यात त्यांची भांडणं सोडवण्यात मला माझी ऊर्जा फार खर्च करावी लागत नाही, हा खास आनंद. बाजारात गेल्यावर भाज्या कोणत्या उचलायच्या यापेक्षा कोणत्या खाली ठेवायच्या हा माझ्यासाठी यक्षप्रश्न असतो. खाणारी तोंडं कमी, फ्रीज आटोपशीर, त्याहीपेक्षा बाजार ओसंडून वाहात असताना भाज्या फळं घरात कोंबून शिळी करून कशाला खायची, म्हणून हात आखडता घेते. शिवाय आणलेल्या सगळ्या वापरणं म्हणजे भारंभार पदार्थ करणं, आणि मग ते खाणं ओघानं आलंच. अशी ही हवीनकोशी ओढाताण हिवाळ्यातच. मग सुपं, कोशिंबीरी, रसभाज्या असे पोटात जास्तीत जास्त सामावून घेणारे, फार खटपट नसलेले आणि वेळ कमी खाणारे पदार्थ सोयीचे वाटतात. असो.
हे धिरडं गुणी दुधी आणि आपलं देशी गुलाबी गाजर किसून, कांदापात, पुदीन्याचं. यांना जेमतेम बांधून घालेल एवढं सातूचं पीठ. अर्धा चमचा ओवा चोळून. बाकी हवे ते चवीचे जिन्नस घालून थबथबीत करून हातानंच गरम तव्यावर पसरवायचं, झाकण ठेवून वाफ द्यायची. चवीसाठी मी लोणच्याचा मसाला घातला होता, म्हणून वरून वेगळं काही घेतलं नाही.

No comments:
Post a Comment