पूर्वी ऐसपैस व्हायची तेवढी नाही तरी निदान तासाभरासाठी तरी मामांची दिवाळीत भेट झाली. मी निवांत नव्हते ही एक बाब, पण आपण बसू तेवढा वेळ तेही बसून हौसेनं गप्पा मारत राहणार हे लक्षात ठेवणं यावेळी पहिल्यांदाच आवश्यक वाटलं. त्यांच्या आग्रहाखातर नावापुरता फराळ केला. नेहमीप्रमाणे स्वतः काही न खाता समोरच्याला भरपूर खाऊ घालण्याचा शिरस्ता मामांनी अगदी नेमस्तपणे पार पाडला. हालहवालांची देवाणघेवाण घडली. मध्यंतरी त्यांची तब्येत थोडीशी नरमगरम होती, आता पूर्वपदावर येतेय. छान बोलले, ताजेतवाने दिसले.
७५ वर्षांचे हे सद्गृहस्थ, आताशा पूर्वीप्रमाणे वाचन होत नाही याची तक्रार करताना बघून गंमत आणि कौतुक दोन्ही वाटलं. फार वेळ पुस्तकं हातात धरल्यावर डोळे आणि हात अवघडतात. सध्या वाचन बहुतांशी ऑनलाईनच चालू आहे. त्यामुळं नाईलाजानं पुस्तकं मागवण्याचा ओघ बराच आवरता घेतलाय. कष्टानं जमवलेल्या पुस्तकांची निगा राखणं हाही काही कमी व्याप नसतो. तीही झाडपूस झाली होती दिवाळीच्या निमित्तानं.
मामांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं हे कायम आनंदाचं असतं. बाकीच्या गप्पागोष्टी तर होणारच, पण वाचायला नेलेली पुस्तकं परत करायची आणि पुढची न्यायची हा एक ठरलेला कार्यक्रम होता. कनवा आणि मामा, दोघांच्या कृपेनं चारेक वर्षं माझं सलग आणि चांगलं वाचन होत राहिलं. दुपारच्या वेळी गेले तर सहसा त्यांच्याकडची गरम खरपूस चपाती आणि चविष्ट भाजी ठरलेली असते माझ्या नावची. पूर्वी तर संध्याकाळी जाणार असले तरी माझ्यासाठी जास्तीची चपाती आणि भाजी करून ठेवायचा निरोप मी दुपारी आधीच दिलेला असायचा. यावेळी मात्र फराळानं चपाती भाजीला ओव्हरटेक केलं. मामा कधी खवय्ये नव्हतेच, पण रोजची एकच चपाती ठरवताना आपलं वय पक्कं ध्यानात ठेवणारे मामा समोरच्याचं पण वय आडवा हात मारून खाण्याचं राहिलेलं नाही, याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. त्यांच्या दृष्टीनं आम्ही कायम लहानच. काय नव्हेच!
No comments:
Post a Comment