म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Thursday, December 12, 2024

विषय अप्रिय असू शकतो, पण महत्त्वाचा आहे.
तुम्ही डीवर्मिंगसाठी काय करता? जड आणि हलक्या कोठ्याच्या प्रवृत्तीनुसार आहारासंबंधी काय काय काळजी घेता? जंतनाशक किती कालावधीनं घेता?
गेल्या काही वर्षांत बाहेर खाण्याचं किंवा मागवून खाण्याचं प्रमाण एवढं वाढलंय, त्यामानानं डीवर्मिंग केलं जातं का, कल्पना नाही.
पूर्वी पाण्याचं शुद्धीकरण व्यवस्थित नसायचं. आडातून, विहिरीतून, तलावातून, नदीतून थेट पाणी वापरलं जायचं. मुळात पाणीच एवढं मुबलक नव्हतं, स्वयंपाकघरात नळ वगैरे नव्हते. हातांची किंवा एकंदरीतच स्वच्छता तेवढी काटेकोर होत नव्हती. त्यामुळे जंत होण्याचं प्रमाण खूप होतं.
वर्षातून एकदा न चुकता समस्त कुटुंबासाठीची जंतनाशक मोहीम असायची. तेव्हा पोरांबाळांच्या पोटात तरी सर्रास जंत व्हायचेच. मोठ्यांचं माहीत नाही. त्यासाठी एरंडेल पिणे हा एक अप्रिय सोहळा होता. पावसाळा सुरू होण्यापूर्वी एखाद्या शनिवारी रात्री आजोबा एक पांढरी औषधी पूड पाण्याबरोबर द्यायचे. त्या औषधानं ते जंत मरायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी कपातून चहात एरंडेल घालून दिलं जायचं. नाक दाबून तो गिळगिळीत वासरंगहीन द्राव घशातून गटकायचा. हे लिहिताना त्या नुसत्या आठवणीनंही अंग शहारलं. मग आपापल्या वकुबानुसार तासा दोन तासांनी पोट गुडगुडून खळखळायला लागायचं. की वाऱ्या सुरू. मग पोटाला सोसवेलसा पातळसा मऊ भात खायचा पोटाला आधार म्हणून. आता कितीतरी वेगवेगळ्या गोळ्या, औषधांनी आयुष्य सोपं केलंय. आतासारख्या एरंडेलाच्या कॅप्सूल्स तेव्हा मिळत असत्या तर हा सोपस्कार नकोसा झाला नसता.
असं ऐकिवात आहे की एरंडेलामुळं आतडी कोरडी पडतात, म्हणून आता कुणी एरंडेल सुचवत नाहीत. याबद्दल कुणी डॉक्टर किंवा माहीतगार अधिक सांगू शकले तर बरं होईल. तसं असेल तर पूर्वी जंतनिर्मुलनासाठी एरंडेल इतक्या नियमितपणे कसं काय दिलं जात होतं, असा प्रश्न पडतो. कोणतेही डॉक्टर डीवर्मिंग केव्हा केलंय हे विचारत नाहीत. कदाचित आता लोक सावधपणे स्वतः काळजी घेत असावेत म्हणून असेल. आमच्या घरी वर्षातून दोनदा, मे महिन्यात आणि दिवाळीच्या सुट्टीत हा कार्यक्रम असतो. आता ना पूर्वीसारखा दिवस राखून ठेवावा लागतो, ना अशक्तपणा येतो. सगळं कसं 'सुलभ' झालंय.
एरंडेलाचे बाकी पुष्कळ फायदे आम्ही घरगुती पातळीवर अनुभवले आहेत. ते सरसकट सगळ्यांना लागू होतील का ते नाही सांगता येणार, म्हणून तपशील लिहित नाही. दिशाभूल टाळलेली बरी.
तुमचे डीवर्मिंग आणि एरंडेलाबद्दलचे अनुभव जरूर शेअर करा.


No comments:

Post a Comment