माझ्या वडिलांचं कौतुक करण्याचा हा छोटासा प्रयत्न.
घरगुती कारणास्तव गेली चार वर्षं मी आणि माझा मुलगा माझ्या बाबांबरोबर कोल्हापुरात रहात होतो. मात्र ते वास्तव्य कायमस्वरूपी असणार नाही हे आमच्याइतकंच बाबांनाही माहीत होतं. आम्ही नुकतेच पुण्यात परतलो आहोत पण येताना चक्क बाबा आमच्याबरोबर, तेही खुशीने, मनापासून आले आहेत. इतके, की हा त्यांचा निर्णय त्यांनीच घेतला आणि मला त्यांना वेगळं विचारण्याची वेळच आली नाही. आता कुणी श्रद्धा म्हणो की अंधश्रद्धा, पण त्यांनी आपणहून हे ठरवल्यापासून जी काही वेगानं आणि आपोआप चक्रं फिरायला लागली, की आम्ही येऊन स्थिरस्थावर झाल्यावर असं वाटतंय की ते कायमच पुण्यात रहात आलेत. इतकं सगळं सहजपणे होत गेलं. आमच्याकडे आमची लाडकी मांजरी विली पण आहे. खरं सांगते, स्थलांतराच्या इतर सर्व मुद्द्यांपेक्षा मला बाबा आणि विलीची सर्वात जास्त काळजी होती. पण ते दोघंही लगेचच उत्तमपणे रुळलेत. त्यांना एकमेकांचा अतिशय लळा आहे. बाबांना पुणं सवयीचं आहे, ते एक महत्त्वाचं आणि त्यांची सगळी भावंडं, मुली, नातू जवळ असल्यामुळे कदाचित त्यांना आपलं गाव सोडणं तेवढं कठीण गेलं नसावं असा आपला माझा अंदाज.
बाबांनी नुकतंच ७८ पूर्ण केलंय, ते पहिल्यांदाच कायमचे कोल्हापूरबाहेर रहायला आलेत. आम्ही दोघीही बहिणी आणि त्यांची सख्खी पाच भावंडं पुण्यात. माझी आई आणि नंतर सावत्र मातोश्रीही लवकर गेल्यामुळे ते कित्येक वर्षे एकटे रहात होते. मनमिळाऊ स्वभाव, सर्वच बाबतीत स्वावलंबी, आणि एकटेपण अतिशय प्रिय. कधी डबा लावावा, कधी मदतनीस बाईंकडून करून घ्यावं, अधेमधे थोडे दिवस स्वतः रांधावं, नाही तर नातेवाईक आणि मित्रमंडळी चिक्कार आहेत. अगदीच कंटाळा आला तर अन्नछत्रात पंगतीला बसावं. तसे ते अगदी नेमस्त आहेत. उठणं, नाश्ता-जेवणं, अंबाबाई, फिरणं, झोप सगळं ज्या त्या वेळी. पण जगणं, रहाणं संपूर्ण स्वतःच्या मर्जीनंच. कुणाचाही काच नको. ह्याचसाठी आम्ही सगळे त्यांना सतत पुण्यात बोलवत असूनही कधीही चार आठ दिवसांपेक्षा जास्त त्यांचा व्हिसा वाढला नाही, कधी कोल्हापुरातून बाहेर पडण्याचा त्यांचा विचार नव्हता. पण केव्हा तरी ह्याबाबत काही तरी ठरवावं लागणारच होतं.
हे सगळं लिहिण्याचं कारण, ७८ वर्षं ज्या गावात, परिसरात, माणसांत आणि भवतालात काढली, तो सोडून आनंदानं दुसरीकडे जाऊन रहाणं ही त्यांच्या वयात सोपी बाब नाही. मन आणि आयुष्य गुंतलेल्या घटना, संस्था, माणसं, माती सतत नजरेसमोर असण्याची सवय बाजूला करून संपूर्ण नव्या ठिकाणाची, माणसांची, परिसराची, स्वभावांची, मुख्य म्हणजे गावाच्या गतीचीही सवय करून घेणं म्हणजे चेष्टा नाही. हे सगळं मजेत एंजॉय करणं त्याहून अवघड. मी माझ्या अनेक मित्रमंडळींचे एकटे आणि दुकटेही पालक बघतेय, दोन्ही बाजूंसाठी ही फार आव्हानात्मक सिच्युएशन असते. त्यातून खूप नवे प्रश्न आणि तणाव निर्माण होताना दिसतात, ज्याला दोघांकडेही इलाज नसतो. माझं स्वतःचं घर तिसऱ्या मजल्यावर आहे, लिफ्ट नाही. आता लिफ्ट असलेल्या इमारतीत आणि त्यांना सगळ्यांना भेटणं, एकटं फिरणं सोयीचं होईल अशा जागी भाडेकरारावर घर घेतलंय.
पण एवढं झाल्यानंतरही, आल्यावर त्यांना वातावरणाशी जुळवून घेता आलं नसतं तर आम्ही काय करणार होतो? अगदी वहातुकीपासून महागाईपर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते. ती तडजोड खरंतर बदलत्या काळानुसार आपापल्या शहरातही केली जात असते, पण ती नकळत होत असल्याने जाणवत नाही. शिवाय सवयीचं वातावरण जास्त, ओळखीतली माणसंही त्यातूनच जात असल्याने बदल अंगावर येत नाहीत. दुसऱ्या शहरात तितक्या सहजतेनं तसं होत नाही.
त्यात ज्येष्ठ नागरीकांच्या तरी मनात पुण्याबद्दल मोठ्या प्रमाणावर पुर्वग्रह दिसतात. त्याच चष्म्यातून बघत राहिल्यामुळे सरळ घटनांचेही वेगळे अन्वयार्थ काढले जातात. पहिल्यांदाच परदेशी गेल्यावर घडोघडी रुपया आणि डॉलरची तुलना होत रहाते, तसंच हे चित्र असतं. सुदैवानं ती शक्यता बाबांच्याबाबतीत नव्हती, तरी डोळे लहान मोठे व्हायला अगदी केस कर्तनालयं किंवा डोश्या-पोह्यांचे दरही पुरतात! मग टपरी, गाडा, लहान ते नामांकित उपाहारगृह अशी सगळीकडे वरात काढून त्याच पातळ्यांवर कोल्हापुरातली ठिकाणं ठेवली की पटतं हळूहळू. शहर कोणतंही असो, आपल्याला आपल्या बजेटमधल्या सोयी नक्की उपलब्ध असतात, त्या जरा शोधाव्या लागतात, इतकंच. त्यांना बदलांशी जुळवून घेणं सोपं आणि मजेचं व्हावं म्हणून चालू असलेल्या आमच्या खटपटींचं हे एक गंमतीशीर उदाहरण. प्रगत सोयी वापरणं, ह्या वयात आरामशीर जगण्याला प्राधान्य देणं आणि त्यासाठी ऐपत असेल तर खळखळ न करता पाच पैसे जास्त खर्च करणं, ह्या सवयी ज्यांना रिक्षात पाऊल घालणं ही चैन वाटते अशा बाबांच्या गोड बोलून गळी उतरवणं सुरू आहे. आयुष्यभर कष्ट करून केलेल्या बेगमीचा स्वत:साठी उपभोग घ्या, हे त्यांना शक्य होईल तसं सांगतो आहोत.
महत्त्वाचं म्हणजे हे करताना आम्हां सर्व कुटुंबियांमध्ये एकवाक्यता आहे. ते इकडे आल्यामुळे सगळ्यांना मनापासून बरं वाटलंय, ते हवे आहेत, हे प्रत्येकजण त्यांना कृतीतून, चौकशीतून सांगतंय. ते रमतील ह्याची खात्री सगळे मिळून करताहेत. आम्हाला ते आनंदानं प्रतिसाद देतायत, ज्यामुळे आमचीही रुटीन्स आता निर्धास्तपणे सुरू झाली आहेत. ह्या घडामोडींनंतर, निर्णय सोपे नसतात पण ते करून घेता येतात, हे मी बाबांकडून शिकले आहे असं नक्की म्हणू शकते. परिस्थितीचा नीट केलेला स्वीकार सगळ्यांसाठी परिस्थिती किती सुकर करू शकतो, हे दिसतंय. सरसकटपणे ते सोपं नसतं, हे अगदी खरं आणि मान्य आहे. मी फक्त आम्ही अनुभवतोय ती शक्यता नमूद केली. बाबांचे त्यांनी केलेल्या ह्या स्विकारासाठी अगणित आभार आहेत.
No comments:
Post a Comment