#न्याहरी #उन्हाळा #गारेगार #नाश्ता #झटपटपदार्थ #साधेसोपेपदार्थ
घरचं ताजं थंडगार सुमधुर ताक पेलाभर, मूठभर जाड पोहे, पांढरा कांदा, ओलं खोबरं (नसेल तरी चालेल, मला आवडतं म्हणून सगळ्यात ढकलते), भरपूर ताजी कोथिंबीर, मीठ, साखर.
मला कमीत कमी सोपस्कार आणि सपक चवी आवडतात, सकाळी सकाळी तर अगदीच. तरी आज लाल मिरचीचा ठेचा घेतला आहे कडेला.
पेलाभर ताकातले मूठभर पोहे कुंडा भरून होतात. यानंतर मोठा पेलाभर माठातलं गारेगार पाणी प्यावं आणि पीत रहावं. पोट आणि मन न तंडता सुखानं नांदत काळाचा एक मोठा तुकडाभर समाधानानं गप्प रहातात.
ऐच्छिक भर यापैकी कशाचीही - आवडीची खमंग फोडणी, नुसत्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, नुसती पुदिन्याची पानं, ठेचा, खर्डा, भुरका, लसणाचं तिखट, शेंगदाण्याची चटणी, लोणच्याचा खार, लोणचं, मेतकूट, डांगर, भाजलेले शेंगदाणे (सोललेले असल्यास अधिक छान दिसतात), खारी/तिखट बुंदी, चाट मसाला, ताक मसाला, कांदा लसूण मसाला, टोमॅटो, काकडी, डाळिंबाचे दाणे वगैरे वगैरे आपापल्या कल्पकतेनुसार.
No comments:
Post a Comment